आश्‍चर्य आहे ! वीस वर्षांपासून सुरू आहे आदिवासी महिलांचा "पाण्याचा शोध'...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

बिरसानगर कुही फाटा येथे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या आदिवासी भटक्‍या मायमाउलींच्या पायांना चटके बसत आहेत. उमरेड तालुक्‍यात आदिवासीं भटक्‍यांच्या वस्तीवर अनेक वर्षांपासूनची भीषण पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून हातपंपही मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

चांपा (जि.नागपूर) : सूर्याच्या प्रकोपाने जनजीवन होरपळून निघत आहे. नागपुरात पारा 47 अंशांपर्यंत गेला आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही-लाही होत असताना भटक्‍या विमुक्त आदिवासी बांधवांवर घोटभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमरेड तालुक्‍यातील सूरगाव ग्रामपंचातीअंतर्गत कुहीफाटा, बिरसानगर गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे.

नक्‍की वाचा : ग्रामस्थांना वाटतो वाघ, वनविभागाचे कर्मचारी म्हणतात, लांडगा आला रे आला...

बिरसानगर, कुहीफाटा येथे भीषण पाणीटंचाई
बिरसानगर कुही फाटा येथे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या आदिवासी भटक्‍या मायमाउलींच्या पायांना चटके बसत आहेत. उमरेड तालुक्‍यात आदिवासीं भटक्‍यांच्या वस्तीवर अनेक वर्षांपासूनची भीषण पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून हातपंपही मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. "सायेब, कित्येकदा पाण्यासाठी ग्रामपंचायतीला अर्ज केले. परंतु, आमच्या मागणीला ग्रामपंचायतीकडून केळाची टोपली दाखवली जात आहे. आम्ही 20 वर्षांपासून पाण्यासाठी कधी तीन किालोमीटरची पायपीट तर कधी शेतात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहोत, अशी प्रतिक्रिया या बांधवांनी व्यक्‍त केली.

हेही वाचा : पैसेवारी काढताच कशाला?

पाण्याचा टॅंकरही मिळेना
सुरगाव ग्रामपंचातही आमचे प्रश्न ऐकत नाही, सायेब आमच्या प्रश्नांना कोणीही वाचा फोडीत नाही. सायेब लॉकडाउनमुळे हाताला काम मिळत नसल्याने घरात अन्नाचा एकही दाणा नाही, उपाशी पोटी रात्र काढावी लागते. त्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे इंदूबाई माहापुरे यांनी भावूक होऊन सांगितले. बिरसानगर येथील भटक्‍या आदिवासी वस्तीत पाणीपुरवठा योजना अंतर्गत एक ही काम झाले नसल्याचाही आरोप येथील महिलांनी केला. या परिस्थितीत मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचयतीमार्फत भटक्‍या आदिवासीं वस्तीवरून काही अंतरावर कोरडी विहीर आहेत, तीही आटली. सुरगाव येथील सरपंचांना पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा सूचना दिल्या. त्यांनी दोन ते तीन दिवसांनी भटक्‍या आदिवासी वस्तीतील पाचशे मीटर अंतरावर असलेल्या कोरड्या विहिरीतून सुरगाव येथील सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरठा केला.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय हॉलीबॉलपटू म्हणते खेळावर "फोकस' करण्यासाठी नोकरी हवीच

गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप
मात्र काहींना पाणी मिळाले, काहींना खाली घागर घेऊन घरी जावे लागते. आमच्या वस्तीवर सार्वजनिक पाणीपुरवठ्याकरिता सार्वजनिक नळयोजना सुरू करावी, गावातील अनेक वर्षांपासूनची टॅंकरची मागणी यंदाही पूर्ण झाली नसल्याचे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक नळाच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले गेले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आमच्या वस्तीवर तत्काळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सुगंधा गुजर, आशाबाई गुजर, संजय महापुरे, इंदूबाई माहपुरे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal women's 'search for water' has been going on for twenty years ...