
जिल्ह्यातील तेराही पंचायत समित्यांचा आढावा घेतला असता वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या काळात ९७ मोटराइज्ड ट्रायसिकल दिव्यांगांना वाटपच करण्यात आले
नागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या ट्रायसिकल दोन वर्षांपासून पंचायत समितीत धूळखात पडून आहेत. महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी याकडे लक्ष वेधले.
हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...
हिंगणा पंचायत समितीअंतर्गत तर तब्बल २५ ट्रायसिकल्स धूळखात पडून असल्याचे सभापती उज्ज्वला बोढारे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. जिल्ह्यातील तेराही पंचायत समित्यांचा आढावा घेतला असता वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या काळात ९७ मोटराइज्ड ट्रायसिकल दिव्यांगांना वाटपच करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. वित्त सभापती भारती पाटील यांनी हा उचलून धरला. ट्रायसिकलसाठी लाभार्थ्यांचे अर्जच आले नाही, तर त्या खरेदी का केल्यात, असा सवाल उपस्थित करण्यात आला. भाजपची सत्ता असताना ही खरेदी झाली होती. ट्रायसिकल खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. विद्यमान समाजकल्याण सभापती नेमावली माटे यांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर अप्रत्यक्षरीत्या ताशेरे ओढण्यात आले. ट्रायसिकलच्या बॅटरी खराब होत असल्याचे बोढारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रायसिकल्स वाटप न होता खराब झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती
अर्जदारांची यादी मोठी असते. त्यामुळे यादीतील उर्वरित लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात येतील. ते करताना नियमांचे पालन करण्यात येईल. यावर कुणालाही आपले नाव लिहिता येणार नाही.
-रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
पं. स.मध्ये पडून असलेल्या ट्रायसिकल -
पंचायत समिती | ट्रायसिकलची संख्या |
हिंगणा | २५ |
उमरेड | ८ |
नरखेड | ७ |
मौदा | १६ |
कळमेश्वर | ९ |
नागपूर ग्रामीण | ६ |
सावनेर | ८ |
भिवापूर | २ |
पारशिवनी | ० |
कामठी | ३ |
काटोल | ११ |
रामटेक | ० |
कुही | २ |