अरेरे उपाशीपोटीच गेला तिघांचा जीव, जेवणासाठी रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडले

गजेंद्र डोंगरे
Tuesday, 29 September 2020

सोमवारी (ता.२८) दोन ट्रक तांदूळ भरून तिवसा (जि. अमरावती) येथे जात होते. रात्री १२ वाजता कोंढाळीनजीकच्या सबा ढाब्यावर जेवण करण्याकरिता दोन्ही ट्रक थांबवून रास्ता ओलांडत असताना अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने तीन चालकास चिरडले.

बाजारगाव/कोंढाळी (जि नागपूर) ः येथून अर्धा किलोमीटर अंतरावरील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सबा ढाब्यावर रात्री १२ वाजता तीन ट्रकचालक रस्ता ओलांडून जेवण करायला जात असताना येणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडले. एक गंभीर जखमी आहे. भरधाव ट्रकचालक तिथून लगेच पसार झाला.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता.२८) दोन ट्रक तांदूळ भरून तिवसा (जि. अमरावती) येथे जात होते. रात्री १२ वाजता कोंढाळीनजीकच्या सबा ढाब्यावर जेवण करण्याकरिता दोन्ही ट्रक थांबवून रास्ता ओलांडत असताना अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने तीन चालकास चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

हा अपघात एवढा भयानक होता की, तिन्ही चालकांच्या शरीरावरुन ट्रक गेल्याने शरीर पूर्णतः चेंदामेंदा झाले होते, तर तर यात एक गंभीर जखमी झाला. शेख अनू (वय २०, शिवनी अकोला), जावेद खान वय २८, खदान अकोला), शेख परवेज वय३५, वाशीम, बायपास अंबिका नगर अकोला) हे जागीच ठार झाले. तर चालक फिरोज खान (वय ४५) गंभीर जखमी तसेच यात ट्रक क्लीनर सोहेल खान(वय १८, वाशीम) हा थोडक्यात बचावला. 

ट्रक अमरावतीकडे भरधाव वेगाने पसार झाला. घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच ठाणेदार श्‍याम गव्हाणे, एएसआय दिलीप इंगळे, हेडकॉंन्स्टेबन किशोर लोही, दारासिंग राठोड, मंगेश धारपुरेंसह घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला. फरार ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. तीनही मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले व अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. ठाणेदार श्‍याम गव्हाणे पुढील तपास करीत आहेत. 

संपादन  : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A truck crushed three truck drivers near Kondhali