...आणि तुकाराम मुंढेंनी दिली त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Tukaram-Mundhe
Tukaram-Mundhe


नागपूर : आतापर्यंत आपल्या शिस्तपियतेने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरविणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चक्क कोरोनाग्रस्तांच्या भागात सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम केला. नागपूरकरांची काळजी घेताना स्वतःचीही काळजी घ्या, असा सल्ला देत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला.
कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे. कोरोनाग्रस्त भागासह शहरातील विविध भागांत सर्वेक्षण सुरू आहे. सकाळी आयसोलेशन हॉस्पिटलमधून सर्वेक्षणाला निघत असताना आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची बसमध्येच भेट घेतली. आयुक्तांना बघताच बसमध्ये बसलेले सारेच कर्मचारी अवाक झाले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधले. जीव धोक्‍यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी, असे म्हणत एका सीटवर एकानेच बसण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सगळ्यांना कोविड-19 च्या गाइडलाइन्सप्रमाणे सर्वेक्षणात माहिती गोळा करण्याच्या सूचना देत आयुक्तांनी नागपूरकरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम करायचे असल्याचे सांगितले.

अचानक शिरले दुकानात
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागांचाही दौरा केला. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी दिसली. या दुकानात ते पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटांच्या अंतरावर उभे करून सामाजिक अंतराचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. रेशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटांवर खुणा करण्यास सांगितले.

सविस्तर वाचा~ उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी
मास्क वापरण्याचे आवाहन
आता प्रत्येकाने मास्क वापरण्याची गरज आहे. मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले. एवढेच नव्हे, तर "मास्क इंडिया डॉट कॉम' या संकेतस्थळावर जाऊन स्वतः मास्क तयार करणे शिका व ते वापरा, असा सल्लाही त्यांनी नागपूरकरांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com