महापौर म्हणाले कॉटन मार्केट सुरू करा, तुकाराम मुंढे म्हणाले शक्य नाही...

tukaram mundhe
tukaram mundhe

नागपूर : भाजीपाला खरेदीसाठी येणारे भाजी विक्रेते, नागरिक तसेच भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून आयुक्तांनी कॉटन मार्केट बंद केले. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी येथील व्यापाऱ्यांसोबत चर्चेनंतर उपायुक्त महेश मोरोणे यांना कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले. परंतु आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौरांच्या उपस्थितीतच कॉटन मार्केट बंदच राहणार, असे स्पष्ट केले अन्‌ बैठकीतील सारेच अवाक् झाल्याचे सूत्राने नमूद केले. 

महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेत स्वच्छता व फवारणीबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींमधील प्रचंड असंतोषासंदर्भात महापालिकेत बैठक घेतली. बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंटू झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी (स्वच्छता) उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांची कॉटन मार्केटमधील व्यापाऱ्यांनी भेट घेतली होती. महापौर संदीप जोशी यांनी तत्काळ उपायुक्त महेश मोरोणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.

कॉटन मार्केट बंदच राहणार 
कॉटन मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या 50 किंवा 100 ठेवा, टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये वाहने सोडा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाळावयाचे सर्व नियम पाळण्याची ताकीद देऊन तातडीने कॉटन मार्केट सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. आयुक्तांनी कॉटन मार्केट बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र महापौरांनी कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिल्याने दोघांतही समन्वय नसल्याची बाब उघडकीस आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बैठकीत कोरोनाचा विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्‍यक असून कॉटन मार्केट पुढील काही दिवस बंद करण्याच्या निर्णयाबाबत स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही कॉटन मार्केट सुरू करण्याचा विचार मांडला होता. 

बैठकीत अचानक आगमन 
फवारणी व स्वच्छता यावर महापौरांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अचानक पोहोचून उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिल्याचे सूत्राने नमूद केले. महापालिकेत महापौरांनी यापूर्वी अनेक बैठका घेतल्या. शिष्टाचाराप्रमाणे आयुक्तांना आमंत्रितही करण्यात येते. परंतु यापूर्वी आयुक्तांनी एकाही बैठकीला हजेरी लावली नाही. अचानक आजच्या बैठकीत हजेरी लावल्याने सारेच आश्‍चर्यात पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com