एकीकडे नागरिकांचे समर्थन, दुसरीकडे नगरसेवकांची विरोधाची भूमिका; काय होणार तुकाराम मुंढेंचं?

सोमवार, 22 जून 2020

शनिवारी महापालिका सभेत सदस्यांच्या शेरेबाजीमुळे संतप्त झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडले. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. काहींनी त्यांच्या अपमानावरून नगरसेवकांवर हल्ला चढविला.

नागपूर : महापालिकेत आयुक्तांसोबत वाक्‌युद्ध करणारे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभेनंतर काही तासांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आयुक्तांची कथित नियमबाह्य कामे असून सोमवारपासून नागरिकांपुढे मांडणार असल्याचा इशारा दिला. त्याच वेळी आयुक्तांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर तरुणाईच नव्हे, तर काही ज्येष्ठ नागरिकही पुढे आले आहेत. एकीकडे नगरसेवकांचा असलेला विरोध तर दुसरीकडे सोशल मीडियावरील मिळणारा पाठिंबा, यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सभेत परतण्याबाबत मार्गच बंद होत असल्याचे चित्र आहे.

शनिवारी महापालिका सभेत सदस्यांच्या शेरेबाजीमुळे संतप्त झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडले. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. काहींनी त्यांच्या अपमानावरून नगरसेवकांवर हल्ला चढविला. शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी आयुक्तांची प्रतिमाच त्यांची वैरी ठरत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केले. यावर अनेक नेटकऱ्यांनी आयुक्तांची बाजू उचलून धरली. प्रामाणिक माणसाचा हिरमोड करू नका. त्यांचे एकतरी नियमबाह्य कामे दाखवा, अशी कमेंट अनेकांनी केली आहे. एवढेच नव्हे, फेसबुकवर एकाने तर सभागृहात काय झाले, त्याचे रेकॉर्डिंगच जाहीर करण्याची मागणी केली.

जाणून घ्या - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली 'ही' कारवाई, काय गुन्हा होता 'त्यांचा', वाचा...

शनिवारच्या घटनेनंतर आयुक्तांना नागपूरकरांचे मोठे समर्थन मिळत आहे. माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आयुक्त कमीत कमी खर्चात कामे करीत असल्याने अनेकांच्या पोटात दुखायला लागल्याचे सांगितले. या समर्थनामुळे नक्कीच त्यांचा आत्मविश्‍वास वाढण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे काल सभागृहात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करीत त्यांच्यासोबत वाक्‌युद्ध करणारे दयाशंकर तिवारी यांनी सभेनंतर काही तासांमध्ये एक व्हिडिओ टाकला. यात त्यांनी कोरोनाबाबत केलेल्या कामावरून आयुक्तांचे कौतुक करतानाच त्यांच्या कथित नियमबाह्य कामकाजावर प्रहारही केला.

केटीनगर मॉल ते हॉस्पिटलचा प्रवास नियमबाह्य असून सर्व पुरावे असल्याचे त्यांनी या व्हिडिओतून नमूद केले. या प्रकरणाप्रमाणेच आयुक्तांचे अनेक नियमबाह्य कामे सोमवारपासून जनतेपुढे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय काही नगरसेवकांनीही सोशल मीडियावरून आयुक्त मुंढे यांच्याविरुद्धची भूमिका कायम ठेवली. एकीकडे नागरिकांचे वाढते समर्थन, दुसरीकडे नगरसेवकांची विरोधाची भूमिका कायम असल्याने ते सभेत परतण्याची शक्‍यता धूसर दिसत आहे.

क्लिक करा - 'प्लान बी'सुद्धा तयार ठेवा; या नवनियुक्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला कानमंत्र

नेत्यांपर्यंत पोहोचली घटना

आयुक्तांनी सभागृह सोडल्यानंतर काही क्षणातच घटनाक्रम शहरातील सर्वच मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचला. नागरिकांचे समर्थन मिळत असलेल्या आयुक्तांविरुद्ध पाऊल उचलण्यासाठी नेतेही मागेपुढे पाहात आहेत. काहींनी नेत्यांकडे आयुक्तांची तक्रारही केल्याचे समजते. एका नेत्याने मंगळवारच्या सभेपर्यंत कळ सोसण्याचा सल्ला तक्रारकर्त्यांना दिल्याचे सूत्राने नमूद केले.