राज्यात वनांचे आच्छादन क्षेत्र वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, नागपूर विभागात 28 हजार हेक्‍टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

राज्य शासनाने 28 हजार हेक्‍टर 445 क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. 63 हजार 750 हेक्‍टचे उदीष्ट असताना त्यापेक्षा अधिक 64 हजार 927 हेक्‍टर क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी प्रस्ताव वन विभागाकडे आलेले आहेत. निर्धारित उदीष्टापेक्षा अधिक जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे.

नागपूर : नागपूर विभागातील 28 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून कलम चार अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे. राज्यात वनांचे आच्छादन क्षेत्र वाढविण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.

नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात देशातील एक लाख 78 हजार हेक्‍टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी वन व्यवस्थापनास योग्य असलेले 92 हजार 116 हेक्‍टर क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार राखीव वनक्षेत्राची अधिसूचना काढण्याचे करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने 28 हजार हेक्‍टर 445 क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. 63 हजार 750 हेक्‍टचे उदीष्ट असताना त्यापेक्षा अधिक 64 हजार 927 हेक्‍टर क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी प्रस्ताव वन विभागाकडे आलेले आहेत. निर्धारित उदीष्टापेक्षा अधिक जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - दत्रात्रेयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा भाचीची हत्या

दरम्यान, उर्वरित झुडपी क्षेत्रदेखील राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे काम येत्या काळात केले जाणार आहे. राज्यातील उर्वरित झुडपी जंगल क्षेत्र डिसेंबर 2021 अखेरपर्यंत कलम 20 नुसार जमाव बंदीची प्रक्रिया पूर्ण करुन राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात येणार आहे. या क्षेत्रास आता भारतीय वन अधिनियम, 1927 च्या तरतुदी लागू होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राखीव वनक्षेत्रात देखील वाढ होणार आहे. या क्षेत्रावर पुढील पावसाळ्यात वनीकरणाची कामे घेण्यात येतील. विभागातील अधिसूचित झुडपी जंगलामध्ये नागपूर जिल्ह्यातील 1419.12 हेक्‍टर, वर्धा 906 हेक्‍टर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 21099 हेक्‍टर जंगलाचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 3093.58 हेक्‍टर व चंद्रपूर जिल्ह्यातील 1847.42 हेक्‍टरचाही यात समावेश आहे.

जमाबंदी प्रक्रियेस प्रारंभ
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डिसेंबर 2021 चे आत जमाबंदी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील 11564.43 हेक्‍टर, वर्धा 3881.08 हेक्‍टर, भंडारा 5736.25 हेक्‍टर, गोंदिया 22700.40 हेक्‍टर, चंद्रपूर 4667.53 हेक्‍टर. गडचिरोली 4935.92 हेक्‍टर जिल्ह्यातील एकूण 53 हजार 487.61 हेक्‍टरसाठी संबधित उपविभागीय अधिकारी यांना वनजमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत पुढील जमाबंदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty eight thousend hector reserve forest in Nagpur division