‘कौन बनेंगा करोडपती’तून फोन आल्याने युवकाचा खून; सत्य आले समोर

अनिल कांबळे
Monday, 21 September 2020

दोन दिवसांपूर्वीही याच कारणावरून यश याने कासिम याला शिवीगाळ केली होती. दोघे दुचाकीने यश याला घेऊन सेनापतीनगरमधील मैदानात गेले. तेथे चाकूने वार केल्याने यशचा मृत्यू झाला.

नागपूर : वाठोड्यातील सेनापतीनगर येथील हत्याकांडाचा अवघ्या दोन तासांत पर्दाफाश करून गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोन मारेकऱ्यांना अटक केली. इम्तियाज अली मुख्तार अली (वय २१, रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) व शेख कासीम ऊर्फ गोलू शेख राशीद (वय २४, रा. गौसिया कॉलनी, बेसा पॉवर हाउसजवळ), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. यश मधुकर ठाकरे (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी) असे मृतचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून यश याच्या मोबाईलवर ‘कौन बनेंगा करोडपती’मधून फोन यायचे. त्याला करोडो रुपयांची रक्कम बक्षिसात मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात येत होते. ही बाब त्याने इम्तियाज व कासिम या दोघांना सांगितली होती. आपण सोबत दरोडे टाकतो. मिळालेल्या रकमेची तिघांमध्ये सारखी वाटणी करतो. ‘करोडपती’तून मिळणाऱ्या रकमेचीही सारखी वाटणी करू, असे दोघे यश याला म्हणायचे. यश हा त्यांना नकार द्यायचा.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

दोन दिवसांपूर्वीही याच कारणावरून यश याने कासिम याला शिवीगाळ केली होती. दोघे दुचाकीने यश याला घेऊन सेनापतीनगरमधील मैदानात गेले. तेथे चाकूने वार केल्याने यशचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहायक उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, हेडकॉन्स्टेबल देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, कृपाशंकर शुक्ला, शिपाई आशिष क्षीरसागर, शिपाई सचिन तुमसरे, दीपक झाडे व श्रीकांत मारोडे यांनी आरोपींचा छडा लावला.

बकरामंडीत होते लपून

दोघेही खून केल्यानंतर मोमिनपुऱ्यातील बकरामंडीत लपून बसबे होते. याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तिघांविरुद्धही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तिघेही मित्र असून त्यांना गांजाचे व्यसन होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two accused in the murder arrested