कोरोनाच्या उद्रेकात दिलासा देणारी बातमी, नागपुरात या आजाराचे केवळ दोन रुग्ण

Malaria in Nagpur city
Malaria in Nagpur city

नागपूर : गतवर्षी स्क्रब टायफस, स्वाइन फ्लूचा प्रकोप झाला होता. डेंगीचा तर उद्रेक होता. यावर्षी कोरोनाचा स्फोट झाला आहे. मात्र, मलेरियाने नागपूर वगळता पूर्व विदर्भात चांगलेच हातपाय पसरले आहेत. 30 लाखांच्या नागपूर शहरात अवघे 2 मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. हीच स्थिती नागपूरच्या ग्रामीण भागातही दिसते. 25 लाखांच्या ग्रामीण भागात अवघे 2 मलेरियाचे रुग्ण आढळले. यामुळे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र, दरवर्षीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा ब्लास्ट झाला. एकाच जिल्ह्यात 1 हजार 704 मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. यामुळे येथील स्थानिक आरोग्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्यात सहा महिन्यांत अवघे चार रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी फसवी आहे की खरी, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2019 या कालावधीत हिवतापाचे (मलेरिया) 1 हजार 682 रुग्ण आढळले आहेत. यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते जून 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत 1 हजार 794 मलेरियाग्रस्त आढळले. यात 5 मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पुणे येथील कार्यालयात नोंदविली आहे.

जानेवारी ते आजपर्यंत मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून हिवताप नियंत्रण तसेच उपचार यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. त्या तुलनेत हिवतापावर यावर्षी नागपूर जिल्ह्यात नियंत्रण आले आहे, असे म्हणता येईल. महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. या विभागांवर साथीच्या आजारांची जनजागृती आणि नियंत्रणाची जबाबदारी असते.

आर्थिक तरतूदही केली जाते. मलेरिया अर्थात हिवतापाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद गडचिरोलीत आहे. 1 हजार 704 रुग्ण आढळले असून दोघे जण दगावले आहेत. गोंदिया जिल्ह्यात 23 रुग्ण आढळले. भंडारा जिल्ह्यात 2 रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूरमध्ये 51 रुग्ण आढळले असून 3 जण दगावले आहेत.

आता धोका जपानी मेंदूज्वराचा

पूर्व विदर्भात 10 वर्षांपूर्वी चंडिपुरा मेंदूज्वराने धुमाकूळ माजवला होता. त्यानंतर नागपूरकरच नव्हे, तर पूर्व विदर्भ या रोगापासून दूर होता. मात्र, पुन्हा एकदा जपानी मेंदूज्वराची जोखीम दिसत आहे. अवघ्या सहा महिन्यांत जपानी मेंदूज्वराचे 35 रुग्ण आढळले आहेत. यावर्षी मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, गतवर्षी 10 जण जपानी मेंदूज्वराने दगावले होते. यामुळेच आरोग्य विभाग खडबडून जागा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com