नागपुरात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020


नागपुरात कोरोनाचे मिटर वेगात फिरत असून आज आणखी 18 रुग्णांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे तर दोघांचा मृत्यू झाला. समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी 24 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.

नागपूर :  कोरोना विषाणूने आणखी दोन रुग्णाचा बळी घेतला असून आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या 23 झाली असल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. शुक्रवारी एकूण 18 जणांची कोरोना बाधितांमध्ये भर पडली असली तरी 24 जणांनी कोरोनावर मातसुद्धा केली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांची एकूण संख्या 1402वर पोहोचली आहे.
शुक्रवारी दगावलेल्या दोघांपैकी एकाला मूत्रपिंडाशी निगडित गंभीर आजार होता. आज दगावलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. ती 40 वर्षांची असून गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त होती. डोबीनगरातील रहिवासी या मधुमेही महिलेला अत्यवस्थ स्थितीत गुरुवारी रात्री नातेवाईक मेयोत घेऊन आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत ती रस्त्यातच दगावली होती. त्यानंतर महिलेच्या घशातील स्त्राव नमुना तातडीने तपासला असता त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.
दुसरा दगावलेला व्यक्ती मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. किडनीशी निगडित आजारामुळे तो काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात डायलिसीवर उपचार घेत होता.

वाचा- पोलिस उपायुक्तांच्या वाहनाला ट्रकची धडक

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आले होते. या 64 वर्षीय ज्येष्ठाला अत्यवस्थ स्थितीत खासगीतून मेयोत रेफर करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्याचे निधन झाले. या सगळ्या घटनाक्रमात शहरात पुन्हा 18 कोरोनाबाधितांची भर पडली.

नव्याने कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये सकाळच्या सत्रात 9 नमुने मेयोच्या लॅबमधून पॉझिटिव्ह आले. यात पाचपावली विलगीकरण केंद्रातील एकाचा समावेश आहे. तर कामठीतील मिलिटरी रुग्णालयातील 4 , नारी परिसारातल्या कडू लेआउट, भोईपुरा, महाल आणि वाठोडातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुपारच्या सत्रात मेयोतून आणखी 4 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात खामलातील डिप्टी सिग्नल, लाईक तलाव, टाकळघाट आणि मोमिनपुरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळच्या सत्रात एम्सच्या लॅबमधुनही 4 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे चारही स्वॅब सिम्बॉयसिस विलगीकरण केंद्रातून पाठविण्यात आले होते.

24 जण कोरोनामुक्त

आजची दिलासायक म्हणजे विषाणूची बाधा झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या 24 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. यात एम्स आणि मेयोतून प्रत्येकी 11 तर मेडिकलमधून 2 जणांना सुटी देण्यात आली. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढून 1055 वर पोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more coroan death in Nagpur