file photo
file photo

नागपूरच्या या दोन बॅडमिंटनपटूंची झाली  'टॉप्स'साठी निवड 


नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत असलेले नागपूरचे दोन युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड व रोहन गुरबानी यांना केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) स्थान देण्यात आले आहे. 


भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) द्वारे मिशन ऑलिम्पिक अंतर्गत 2020 ते 20२8 साठी देशभरातील 12 क्रीडा प्रकारांतील एकूण 258 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात आंतरराष्ट्रीय खेळाडू मालविका व रोहनसह 27 बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच दर महिन्याला 25 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळणार आहे. अखिल भारतीय स्तरावर दुसरे मानांकन आलेल्या मालविकाने जानेवारीत गोवा येथील अ. भा. स्पर्धेसह 15 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप, सिनियर राष्ट्रीयसह नेपाळ, मालदीव व बहरिनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. नेपाळ व मालदीवमधील स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक, तर बहरिनमध्ये ब्रॉंझपदक जिंकले होते.

मालविकाने 17 व 19 वयोगटांतील क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले होते. विश्व क्रमवारीत ती सध्या 162 व्या स्थानावर आहे. शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राहिलेल्या मालविकाने यंदा बारावीच्या परीक्षेत 92.15 टक्के गुण मिळविले होते. रोहनही गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करीत आहे. त्याने राजामुन्द्री (आंध्र प्रदेश) येथे खेळल्या गेलेल्या 44 व्या राष्ट्रीय ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात उपविजेतेपद पटकावले होते. मालविका आणि रोहनची निवड झाली असली १९ वर्षे मुलींच्या दुहेरीत सिमरन सिंघीसोबत राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या नागपुरच्या रितीका ठक्करला मात्र यात स्थान मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे बॉक्सींगमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू आल्फिया पठाण हिची सुद्धा निवड होऊ शकली नाही. 

अमरावतीच्या बाबरेकरचीही निवड 


गेल्यावर्षी इटलीत झालेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अमरावतीच्या शुखमनी बाबेरकर याच्याही या योजनेत निवड करण्यात आली. याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. 

 संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com