'खेल खल्लास'बाबत मिळाली माहिती, पोलिसांनी रचला सापळा आणि...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

रविवारी दुपारी विजय आणि सद्दाम कारने कुणाचा तरी 'खेल खल्लास' करण्यासाठी जात असल्याची टीप गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मनीष गावंडे यांना दिली. पीएसआय गावंडे यांनी कडबी चौक ते दहा नंबर पुलाजवळ पथकासह सापळा रचला.

नागपूर : शहरातील दोन कुख्यात गुंड पिस्तूलसह कुणाचातरी 'गेम' करायला जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, फायटर आणि काडतूससह साडेतीन लाखांचा माल जप्त करण्यात आला. सद्दाम खान अजित खान (25, नवा नकाशा, पाचपावली) आणि विशाल विजय मेश्राम (वय 27, बाळाभाऊपेठ) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम खान आणि विशाल मेश्राम यांच्यावर हत्या, प्राणघातक हल्ले, जुगार आणि खंडणी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही कुख्यात असून, गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. रविवारी दुपारी विजय आणि सद्दाम कारने कुणाचा तरी 'खेल खल्लास' करण्यासाठी जात असल्याची टीप गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मनीष गावंडे यांना दिली. पीएसआय गावंडे यांनी कडबी चौक ते दहा नंबर पुलाजवळ पथकासह सापळा रचला.

संबंधित बातमी : युवकाचा 'फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून

सद्दामची कार या रस्त्यावर जात असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यांनी लगेच कार थांबवून बाजूला घेतली. कारची झडती घेतली असता कारमध्ये एक पिस्तूल, काडतूस आणि फायटर मिळाले. आरोपींवर पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यातही घेण्यात आले. अटकेतील दोघेही आरोपी एका राजकीय नेत्यासाठी काम करीत असून, त्यांना वाचविण्यासाठी तो नेता धडपड करीत असल्याचे सांगितले जाते.

दरोडा टाकण्यापूर्वीच टोळीवर छापा

अंधारात दबा धरून दरोड्याच्या तयारीत लपून बसलेल्या टोळीवर छापा घातला. पोलिसांनी सहापैकी तीन आरोपींना अटक केली. तर त्यांचे तीन साथीदार फरार झाले. अटकेतील आरोपींमध्ये ठाकूर प्लॉट निवासी मोनू उर्फ शेख शाकीर शेख अमिर (24), आझाद कॉलनी निवासी चाजेब उर्फ समीर उर्फ धवन खान परवेज (22) आणि यासीन प्लॉट निवासी आसीफ घोडा शेख युसूफ (29) यांचा समावेश आहे. फरार आरोपी सिंधीबन मोठा ताजबाग निवासी शेख मुबारक (35), हरपूरनगर मोठा ताजबाग निवासी राकेश ऊर्फ वामन रोकडे (23) व मोठा ताजबाग निवासी विकी सिद्धिकी (27) यांचा शोध पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two notorious goons arrested in Nagpur