नागपूरात "करोना' विषाणूचे दोन संशयित रुग्ण! लक्षणे आढळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

दोन्ही संशयितांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोघांचेही घशातील तसेच रक्ताचे नमूने घेण्यात आले असून तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन्ही संशयित रुग्ण चीनमधून आल्यामुळे आरोग्य विभागासह मेडिकलमध्येही खळबळ उडाली आहे. या नमुन्यांचा अहवाल बुधवारीच येणे अपेक्षित होते. परंतु अहवाल आला नाही.

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बुधवारी (ता.5) अचानक दोन करोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष असे की, हे दोन्ही रुग्ण चीनमधून प्रवास करून आले आहेत. करोना विषाणूची लक्षणे आढळून आली असल्याने दोघांनाही एकाचवेळी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नागपुरात दिघोरी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय युवतीचा यामध्ये समावेश आहे. ही युवती चीनमध्ये एमबीबीएसचे (वैद्यकीय अभ्यासक्रम)शिक्षण घेत आहे. तर दुसरा संशयित रुग्ण औरंगाबाद येथील असून 42 वर्षांचा तरूण आहे. चीनमध्ये व्यवसायिक कामासाठी ते गेले होते. चीनमधून परत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला सुरू झाला. बुधवारी मेडिकलमध्ये येताच त्यांना तत्काळ करोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डात दाखल करण्यात आले. दोन्ही संशयितांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोघांचेही घशातील तसेच रक्ताचे नमूने घेण्यात आले असून तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन्ही संशयित रुग्ण चीनमधून आल्यामुळे आरोग्य विभागासह मेडिकलमध्येही खळबळ उडाली आहे. या नमुन्यांचा अहवाल बुधवारीच येणे अपेक्षित होते. परंतु अहवाल आला नाही. करोना विषाणूचे संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मेडिकलमधील डॉक्‍टरांमध्ये चिंता वाढली आहे. गुरूवारी सकाळी दोघांच्याही नमून्यांचा अहवाल येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही संशयितांकडून उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 सविस्तर वाचा - शहरात महिला चोरांची दहशत, बसमधील प्रवाशांकडून पळवला लाखोंचा मुद्दमाल

तीन दिवसानंतरही अहवाल नाही
चार दिवसांपुर्वी मेडिकलच्या वॉर्ड 25 मध्ये दाखल झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा अहवाल न आल्यामुळे त्यांना अद्याप सुटी देण्यात आलेली नाही. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे वारंवार विचारणा करण्यात येत आहे. परंतु अहवाल प्राप्त झाला नाही. आतापर्यंत चार संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील एकाच संशयित रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामुळे त्यांना तत्काळ सुटी देण्यात आली असून सध्या तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two patients of corona viras in Nagpur?