रेल्वे रुळावरचे अनोखे आंदोलन... वाचा नेमके कशासाठी

Unique agitation on the railway train ... read exactly why
Unique agitation on the railway train ... read exactly why

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मंगळवारी मनीषनगर येथील रेल्वे फाटक परिसरात रेल रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. शेकडो विदर्भवाद्यांनी एकत्र येत रेल्वे रुळावर येण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.


वेगळा विदर्भ मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, वीजबिल निम्मे करा, साप चावून मृत्यू झाल्यास मोबदला द्या, आदी मागण्यांसाठी रेल रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमधील 120 तालुक्‍यांतील शेकडो कार्यकर्ते मनीषनगराजवळील मैदानात एकत्र आले. परिसरात पूर्वीच तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय दंगा नियंत्रण पथक, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांचे पथकही परिसरात सज्ज होते. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास माजी आमदार ऍड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात शेकडो विदर्भवाद्यांनी अचानक रेल्वे फाटकाच्या दिशेने आगेकूच केली. रेल्वे फाटकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले. यावेळी पोलिसांसोबत चांगलीच धक्काबुक्की झाली. काही आंदोलक चोरट्या मार्गाने रेल्वे रुळापर्यंत पोहोचण्यात यशस्वीसुद्धा झाले. पण, पोलिसांनी वेळीच त्यांना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला. फाटकापासून काही अंतरावर रोखल्यानंतर महिला आंदोलक पुढे सरसावल्या. यामुळे पोलिसांना अधिक परिश्रम घ्यावे लागले. यानंतर पोलिस विदर्भवाद्यांना गाड्यांमध्ये कोंबून इतरत्र घेऊन गेले.


"केंद्र झाले खुळे म्हणून विदर्भवादी आले पुढे'

विदर्भ राज लेके रहेंगे, केंद्र झाले खुळे म्हणून विदर्भवादी आले पुढे, लाठी खाऊ गोळी खाऊ वेगळा विदर्भ मिळवून घेऊ, विजेच्या दराला लागली आग-कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग, शेती पंपाचे लोडशेडिंग बंद करा, शेतपंपाचे वीजबिल माफ करा आदी घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. बॅनर आणि मागण्यांचे फलक घेऊन विदर्भवाद्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

उग्र आंदोलन करणार
आजचे रेल रोको आंदोलन मिशन 2023 ची केवळ सुरुवात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. 1 मे रोजी विदर्भ बंद करण्यात येईल. त्यानंतरही आंदोलन अधिकाधिक उग्र होत जाईल. वेगळा विदर्भाचा विषय आता सरकारला फार वेळ थोपविता येणार नाही.
ऍड. वामनराव चटप.

वेगळ्या विदर्भाची मागणी 105 वर्षे जुनी आहे. वेगळ्या विदर्भाच्या विषयाच्या विषयावर कॉंग्रेस, भाजपने राजकारण केलं. सत्तेत आल्यावर मात्र त्यांना विसर पडला. अजून वेळ गेली नाही वेगळा विदर्भ देऊन टाका, अन्यथा विदर्भातून दोन्ही पक्षांचा एकही आमदार, खासदार निवडून जाणार नाही.
राम नेवले, मुख्य संयोजक विदर्भ राज्य आंदोलन समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com