छे छेऽऽ पदभरती झाल्याचे पत्र खोटे; विद्यापीठाने दिली माहिती

मंगेश गोमासे
Friday, 6 November 2020

या पत्रावर पूर्णवेळ नियुक्तीचा उल्लेख आहे. याशिवाय वेतन व कार्यालयीन वेळेचाही उल्लेख देण्यात आला आहे. पत्र बनावटी असले तरी यावर गोपनीय विभागाचे सहायक कुलसचिवांचा शिक्का आहे. शिवाय परीक्षा संचालकांचीही सही आहे. या पत्रामुळे शैक्षणिक वर्तुळासह तरुणांमध्येही खळबळ उडाली आहे.

नागपूर : राज्य सरकारने पदभरतीवर बंदी घातली आहे. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लिपीक पदासाठी पदभरती घेत त्यासाठी दिलेले नियुक्ती पत्र समाजमाध्यमांवर फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पदभरतीवर बंदी असताना विद्यापीठाने कशी आणि कधी भरती घेतली असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, अशी कुठलीही भरतीप्रक्रिया झाली नसून हे पत्र बनावटी असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकृत सूत्रांनी दिली.

समाज माध्यमावर फिरत असलेल्या पत्रामध्ये नागपूर विद्यापीठाने १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान आवेदन पत्रामध्ये पात्र असलेल्या उमेदवाराची नियुक्ती केल्याचे हे पत्र आहे. यात उमेदवाराचे नाव दिले आहे. शिवाय त्याने हे पत्र दाखवून ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान जमनालाल बजाज प्रशासकीय भवन नवीन इमारत येथे रुजू व्हावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश

या पत्रावर पूर्णवेळ नियुक्तीचा उल्लेख आहे. याशिवाय वेतन व कार्यालयीन वेळेचाही उल्लेख देण्यात आला आहे. पत्र बनावटी असले तरी यावर गोपनीय विभागाचे सहायक कुलसचिवांचा शिक्का आहे. शिवाय परीक्षा संचालकांचीही सही आहे. या पत्रामुळे शैक्षणिक वर्तुळासह तरुणांमध्येही खळबळ उडाली आहे.

नागपूर विद्यापीठात भरती होऊनही माहिती कशी झाली नाही. बंदी असतानाही भरती झालीच कशी, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, हे संपूर्ण पत्र बनावटी असून कुणीतरी फसवणूक करण्यासाठी हा प्रकार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाने अशाप्रकारे कुठलीही भरती घेतली नसल्याचे सांगण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University recruitment letter goes viral