गुंडांकडून दहशतीसाठी सोशल मीडियाचा वापर, चिमुकल्यांवर परिणाम 

राजेश प्रायकर
Friday, 16 October 2020

ऑनलाईन शिक्षण प्रणालीने मुलांच्या शिक्षणाची समस्या मिटली, परंतु यातून नवनवे संकटही पालकांपुढे येत आहे. मुले आई किंवा वडिलांपैकी कुणा एकाच्या मोबाईलचा वापर करीत आहेत. एखाद्या विषयाचे शिक्षक किंवा शिक्षिका गैरहजर असल्यास मुले थेट आई किंवा वडिलांच्या फेसबुक अकाऊंटवर जात आहेत.

नागपूर : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मारापिटीसह खुनांचेही व्हीडीओ अपलोड होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे चिमुकले सोशल मीडियाच्या अगदी जवळ गेले असून, त्यांना अशा व्हीडीओतून रोमांच दिसत असल्याने ते आकर्षित होत आहेत. परिणामी मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे असे व्हीडीओ ब्लॉक करण्यासंबंधी फेसबुकला रिपोर्ट करण्याची सुविधा असूनही केवळ माहिती नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांना अशा फोटो, व्हिडीओपासून दूर कसे करणार? असा प्रश्न पालकांना पडला आहे.

ऑनलाईन शिक्षण प्रणालीने मुलांच्या शिक्षणाची समस्या मिटली, परंतु यातून नवनवे संकटही पालकांपुढे येत आहे. मुले आई किंवा वडिलांपैकी कुणा एकाच्या मोबाईलचा वापर करीत आहेत. एखाद्या विषयाचे शिक्षक किंवा शिक्षिका गैरहजर असल्यास मुले थेट आई किंवा वडिलांच्या फेसबुक अकाऊंटवर जात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुक पेजवर गुंडांकडून स्वतःची दहशत नागरिकांत वाढविण्यासाठी टाकण्यात आलेल्या व्हीडीओची लाट आल्याचे निरिक्षण सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविले. 

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल
 

यात काही व्हीडीओ तर खुनाच्या घटनांचे आहेत. पंधरवड्यापूर्वी शहरात झालेल्या एका खूनाचे व्हीडीओ सोशल मिडियावर दिसून आले. अजाणतेपणाने काही नागरिकही असे व्हीडीओ अपलोड करताना दिसून येत आहे. चित्रपटातील मारपिटचे दृश्य मुलांना नेहमीच रोमांचक वाटतात. असे व्हीडीओ बघताना ते उत्तेजित होतात. लहान मुले कुठलीही बाब तत्काळ आत्मसात करतात. त्यामुळे हिंसक दृश्यातून त्यांनी वाईट बोध घेतल्यास ते वाम मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नागरिकांनी असे हिंसक व्हीडीओ सोशल मिडियावर अपलोड करण्याऐवजी ते थेट पोलिस पोलिसांच्या फेसबुकवर, पोलिस आयुक्तांच्या फेसबुकवर अपलोड केल्यास त्यांना कारवाईसाठी मोठी मदत होईल. सोशल मिडियातून अशा हिंसक पोस्ट टाकून नकारात्मक पसरविणाऱ्यांवर नियंत्रणासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

अशा टाळा हिंसक पोस्ट

पोस्ट टाकणाऱ्यांच्या नावापुढे उज्व्या बाजूला तीन टिंब असते. त्यावर क्लिक केल्यानंतर विविध पर्यायासह ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट पोस्ट', असा एक पर्याय असल्याचे पारसे यांनी सांगितले. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘न्यूडीटी`, ‘व्हायलन्स', हरॅसमेंट', टेरोरिझ्म असे पर्याय येतात. आवश्यक त्यावर क्लिक केल्यास पोस्ट संदर्भातील संदेश फेसबुकला जातो. पडताळणीनंतर ती पोस्ट ब्लॉक केली जाते.
 

सोशल मीडियाचे नियंत्रण आपल्या हातात
ऑनलाईन शिक्षण घेणाऱी मुले हिंसा, द्वेष पसरविणारे व्हीडीओ तर ते पाहात नाही ना? याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. असे व्हीडीओ टाळण्याबाबत किंवा ब्लॉक करण्यासाठी फेसबुकने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोशल मिडियाचे नियंत्रण आपल्या हातात आहे. त्यामुळे त्याबाबत प्रत्येक पालकांंनी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
- अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक. 

संपादित - अतुल मांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of social media to terrorize effects on children