
पोलिसांत तक्रार केल्यास नाव आणि पत्ता उघड होईल. त्यामुळे समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी होईल, या भीतीमुळे मुली तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे टारगट मुलांचा त्रास वाढून अन्य समस्यांना तोंड फुटते. मात्र, आता मुलींना घाबरण्याचे काम नाही. पोलिस विभागाच्या सायबर सेलने मुलींचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि अन्य माहिती गुप्त ठेवण्याची हमी दिली आहे.
नागपूर : सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण युवा वर्गात वाढले आहे. मैत्रीपासून प्रेमसंबंधापर्यंत युवा पिढी व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरच असते. मात्र, सोशल मीडियाचा गैरवापरही वाढला आहे. त्यासंबंधीच्या अनेक तक्रारी सायबर क्राइममध्ये वाढल्या आहेत. व्हॉट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे आता पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या उपयोगासह गैरवापरही वाढला आहे. त्यामुळेच पोलिस विभागाच्या सायबर सेलकडे तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्सऍप, फेसबुकवर अश्लील कमेंट्स आणि फेक अकाउंटबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय विद्यार्थ्यांपासून ते आता वृद्धांपर्यंत स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. फोनवरून बोलणे आणि ऐकणे ही मर्यादा स्मार्ट फोनने निकाली काढली. आता अनेक बाबींसाठी फोनचा वापर वाढला आहे. मोबाईलवरून बॅंकिंग व्यवहार तसेच लहानसहान खरेदी-विक्रीचे पेमंट करण्यासाठी ऍप्सचा वापर करण्यात येत आहे. विशेषतः प्रत्येक युवक व युवतीच्या हातात स्मार्टफोन आला आहे. एकमेकांशी संबंध वाढविणे किंवा मैत्री करण्यासाठी व्हॉट्सऍप आणि फेसबुकचा वापर वाढला आहे.
सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर
मात्र, व्हॉट्सऍप आणि फेसबुकवरून मुलींना किंवा तरुणींना अश्लील कमेंट्स, मॅसेज आणि फोटो पाठविण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. या प्रकाराचा सर्वाधिक त्रास महिला व मुलींना होत आहे. स्मार्टफोनचा गैरवापर वाढल्यामुळे सायबर क्राइमकडे तक्रारींची संख्या जास्त आहे. मोबाईलवरून मुलींना अश्लील एसएमएस, अश्लील संभाषण किंवा अन्य त्रास दिल्याच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. मुलींच्या फोटोवर अश्लील कॉमेंट्स करणे, अश्लील व्हॉट्सऍप पाठविणे, अश्लील फोटो पोस्ट करणे इत्यादी त्रास मुलींना सहन करावा लागतो.
मात्र, पोलिसांत तक्रार केल्यास नाव आणि पत्ता उघड होईल. त्यामुळे समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी होईल, या भीतीमुळे मुली तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे टारगट मुलांचा त्रास वाढून अन्य समस्यांना तोंड फुटते. मात्र, आता मुलींना घाबरण्याचे काम नाही. पोलिस विभागाच्या सायबर सेलने मुलींचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि अन्य माहिती गुप्त ठेवण्याची हमी दिली आहे.
व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर अश्लील फोटो किंवा कमेंट्स केल्याच्या बऱ्यास तक्रारी सायबर सेलकडे आहेत. यासोबत लॉटरी लागल्याचे सांगून लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. तसेच बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून, एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून पासवर्ड विचारून फसवणूक करणाऱ्यांच्या तक्रारींतही वाढ झाली आहे.
सायबर सेलकडे तक्रार करा
अशा तक्रारींकडे दुर्लक्ष न करता सायबर सेलकडे तक्रार करा. फेसबुक, व्हॉट्सऍप, मोबाईल एसएमएस, सोशल नेटवर्किंग आदींसंबंधीच्या तक्रारी पोलिसांत केल्यास आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचता येते. तक्रारदार मुलीचे नाव कधीच उघड केले जात नाही. त्यामुळे न घाबरता मुलींनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर सेल
मुलींनो, ब्लॉक युजर्सचा वापर करा
मुलींनी फेसबुक वापरताना सेटिंगमध्ये ब्लॉक युजर्सचा वापर करावा. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. मुलाचा फोटो पाहून मैत्री करू नये. अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करू नये. कुणी व्हॉट्सऍपवरून फोटो किंवा मॅसेज पाठवीत असेल तर त्याला प्रथम सूचना द्यावी. त्यानंतर मात्र त्याला ब्लॉक करावे. जर मर्यादा ओलांडत असेल तर पालकांशी चर्चा करून थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी.
- डॉ. अर्जुन माने
सहायक प्राध्यापक, शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था, नागपूर