प्रियकराला वाचविण्यासाठी प्रेयसीने केले असे काही...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

उपराजधानीतून भरदुपारी एका तरुणीचे चार आरोपींनी कारने अपहरण करून डांबून ठेवल्याची भयानक घटना घडल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या घटनेकडे आपले लक्ष वेधत गांभीर्य दाखवले होते.

नागपूर : "प्यार किया तो डरना क्‍या?' असे जरी म्हटले जात असले तरी आई-वडील आणि नातेवाइकांची भीती मुलींच्या मनात कायम असते. एकीकडे जिवापाड प्रेम करणारा प्रियकर तर दुसरीकडे लहानाचे मोठे करणारे आई-वडील. मात्र, अशा स्थितीत नक्‍कीच प्रेमाचे पारडे जड भरते. प्रियकरासोबत रात्री उशिरापर्यंत फिरल्यानंतर प्रियकरावर येणारे संकट लक्षात घेता प्रेयसीने स्वतःच्या अपहरणाचे नाट्य रचले.

सुमारे दहा पोलिस कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, शेवटी तरुणीने प्रियकराला मार खाण्यापासून वाचविण्यासाठी अपहरण झाल्याचे नाटक केल्याची कबुली पोलिसांना दिली. मात्र, उपराजधानीतून भरदुपारी एका तरुणीचे चार आरोपींनी कारने अपहरण करून डांबून ठेवल्याची भयानक घटना घडल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या घटनेकडे आपले लक्ष वेधत गांभीर्य दाखवले होते.

हेही वाचा - आता चिअर्सला नोंद लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरात राहणारी 21 वर्षीय तरुणी सोनम (बदललेले नाव) सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये बी. ए. प्रथम वर्षाला शिकते. तिच्या बाजूच्या वस्तीत राहणाऱ्या राज नावाच्या युवकाची आत्या सोनमची शेजारी आहे. तिच्याकडे राजचे नेहमीचे येणे-जाणे असल्यामुळे दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन मैत्री केली. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

क्लिक करा - मंदिरात दर्शन घेऊन वृद्ध दाम्पत्य गेले शेतावर... नंतर झाले अदृश्‍य

दोघांत मैत्रीनंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. सोमवारी सकाळी राज आणि सोनमने वाकी या पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखला. त्यानुसार त्यांनी तयारीसुद्धा केली. सोमवारी सकाळी अकरा वाजता सोनम नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तासाभरात ती परत आली. सेमिनरी हिल्स परिसरातून दोघेही वाकी येथे निघून गेले. रात्रीपर्यंत दोघेही सोबत फिरले. सोनमच्या लक्षात आले की आईवडील घरी वाट पाहत असतील. त्यामुळे घाबरली. दोघेही रात्रीच्या सुमारास सोनमच्या घराजवळ येऊन थांबले. घरी काय बहाणा सांगावा? या विचारात दोघांचाही तासभर निघून गेला. उशीर झाल्याचा बहाणा न मिळाल्यामुळे सोनमने स्वतः चार युवकांनी कारने अपहरण केल्याचे सांगण्याचे निश्‍चित केले.

असे घडले अपहरण नाट्य

सोनमने आई-वडिलांना सांगितले की, मी कॉलेजसमोर उभी होते. दरम्यान, चार गुंड तेथे आले. त्यांनी माझे तोंड दाबून मला लाल रंगाच्या कारमध्ये कोंबले. त्यानंतर अज्ञात ठिकाणी नेऊन एका घरात कोंडले. माझा मोबाईल हिसकावून घेतला. मला मारहाण केली आणि खोलीत बंद करून निघून गेले. दोन तासांनी ते परत आले. त्यांनी माझा मोबाईल दिला. मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून घरी पळत आले.

असा झाला पर्दाफाश

मुलीचे अपहरण झाल्याचे ऐकताच तिचे आई-वडील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना हकिकत सांगितली. पोलिसांनीही धावपळ केली. त्यानंतर लगेच तिला पोलिस वाहनात बसवून अपहरण झाल्याच्या ठिकाणी नेले. जेथे कोंडून ठेवले ते घर दाखविण्यास सांगितले. मात्र, ती वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करीत होती. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती आपल्या प्रियकरासोबत जाताना दिसून आली. त्यावरून या अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbh nagpur beloved does something for lover