esakal | भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती.

भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर

sakal_logo
By
नरेंद्र चोरे


नागपूर : 1965 मध्ये भारत-चीन युद्धाचे वारे वाहत असतानाच घरगुती क्रिकेट मात्र ऐन भरात होते. त्यात विदर्भ रणजी संघाने भिलाईत रंगलेल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. "लो स्कोअरिंग' लढतीत इम्रान अलींनी सर्वाधिक धावा व सिद्दीकी यांनी आठ गडी बाद करून विदर्भाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते. 


तीनदिवसीय सामन्यात विदर्भ संघात कर्णधार एस. ए. रहिम, ए. एम. बघे, विजय पिंप्रीकर, अरुण ओगिराल, के. वाय. प्रधान, पी. एन. खोत, आर. एन. अभ्यंकर, एस. के. पेंढारकर, इम्रान अली, एम. सिद्दीकी, पी. एस. साठेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर, चंदू सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळेंचे बंधू अशोक जगदाळे, एम. के. जोशी, आर. भाटिया, व्ही. एन. पेंढारकर, बी. जी. खेर, एस. भगवानदास, सुरिंदरसिंग, जे. शाह, उदयसिंग व जे. खट्‌टरसारखे मोठे नाव होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, विदर्भाच्या फलंदाज व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचा निकाल एकतर्फी आपल्या बाजूने लावला. 


हेही वाचा  : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी
 


"मॅटिन विकेट'वर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 142 धावांमध्येच आटोपला. जगदाळे-खट्‌टर या मध्यमगती जोडीने सात गडी बाद करून विदर्भाची चांगलीच दाणादाण उडविली. ओगिराल यांच्या 39 धावा व अभ्यंकर यांच्या 25 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. विदर्भाच्या गोलंदाजांनीही मध्य प्रदेशचा डाव 134 धावांत गुंडाळून आठ धावांची निसटती आघाडी घेतली. फिरकीपटू सिद्दीकी यांनी सर्वाधिक चार विकेट्‌स घेऊन विदर्भाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत विदर्भाने दुसऱ्या डावात 220 धावा काढून सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या इम्रान अलींनी "टेलेंडर्स'च्या मदतीने किल्ला लढवत संघाला दोनशेपार नेले. अली यांची नाबाद 83 धावांची जिगरबाज खेळी सामन्याचा खऱ्या अर्थाने "टर्निंग पॉइंट' ठरली. सिद्दीकी यांचेही 26 धावांचे योगदान बहुमूल्य ठरले. 

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर
 

सिद्दीकी ठरले विजयाचे शिलेदार 


शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी 53 षटकांतच मध्य प्रदेशचा दुसरा डाव 128 धावांत गुंडाळून 100 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजयाचे शिल्पकार सिद्दीकी यांनी पुन्हा चार गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांघिक कामगिरीचा तो विजय वैदर्भी क्रिकेटपटूंसाठी सर्वार्थाने आनंद व समाधान देणारा होता.