सत्तावीस वर्षांपूर्वी विदर्भाने दिली होती अल्वरमध्ये राजस्थानला पटकनी 

सत्तावीस वर्षांपूर्वी विदर्भाने दिली होती अल्वरमध्ये राजस्थानला पटकनी 

नागपूर : एखाद्या गोलंदाजाला अनुकूल वातावरण मिळाल्यास तो किती घातक ठरू शकतो, हे विदर्भाचे फिरकीपटू प्रीतम गंधे यांनी 27 वर्षांपूर्वी अल्वर (राजस्थान) येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर दाखवून दिले. यजमान राजस्थानविरुद्धच्या त्या सामन्यात पहिल्या डावात मागे पडल्यानंतर मोक्‍याच्या क्षणी फिरकीपटू गंधे यांनी हॅट्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ट्रिकसह आठ बळी टिपून विदर्भाला चार गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तो सामना वैदर्भी खेळाडूंच्या सांघिक कामगिरी व एकजूटतेचे फळ असले तरी, गंधे यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच विजय अनेकांच्या लक्षात राहिला. 

डिसेंबर 1993 मध्ये खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात प्रेक्षकांना चारही दिवस त्यांना चेंडू व बॅटमधील द्वंद पाहायला मिळाले. समीर गुजर यांच्या नेतृत्वातील विदर्भ संघात प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, सदाशिव अय्यर, योगेश घारे, उस्मान गनी, प्रीतम गंधे, मनीष दोशी, राजेश गावंडे, निशिकांत जुनघरे, वीरेंद्र बडल्लूसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, प्रवीण आमरेंच्या राजस्थान संघात संजू मुदकवी, गगन खोडा, आर. संघी, व्ही. एस. यादव, ए. डी. सिन्हा, परमिंदर सिंग, गौतम गोपाल, आर. एस. राठोर, शमशेरसिंग, राजेश शर्मा या दिग्गजांचा समावेश होता. 

हेही वाचा - पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून केली धुलाई; पर्समध्ये होत्या आक्षेपार्ह वस्तू...

प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या राजस्थानने संघीचे (68 धावा) अर्धशतक व आघाडी फळीतील अन्य फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर पहिल्या डावात 264 धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाकडून फिरकीपटू दोशीने चार आणि गावंडे व जुनघरेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भाला फाटे (63 धावा) व अय्यर जोडीने (50 धावा) 92 धावांची दमदार सुरुवात करून दिली. मात्र, ही जोडी तुटल्यानंतर विदर्भाचा पहिला डाव 261 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात तीन धावांची निसटती आघाडी घेणाऱ्या राजस्थानचा दुसरा डाव अवघ्या 208 धावांत गुंडाळून विदर्भाने सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. हॅट्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ट्रिकसह आठ बळी टिपणारे ऑफस्पिनर गंधे यांच्या फिरकीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी अरक्षश: नांगी टाकली. राजस्थानकडून सलामीवीर यादव 80 धावा काढून एकाकी किल्ला लढविला.

...आणि विजयावर केले थाटात शिक्‍कामोर्तब 

विदर्भाला 212 धावांचे विजयी लक्ष्य मिळाल्यानंतर उभय संघांमध्ये विजयासाठी शेवटच्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. कोण बाजी मारतो, याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्येही कमालीची उत्सुकता होती. सुदैवाने आघाडी फळीतील फाटे, अय्यर, गुजर व हिंगणीकर यांच्या भरीव योगदानाच्या जोरावर विदर्भाने विजयी लक्ष्य सहज गाठले. फाटे यांनी सर्वाधिक 53 धावा, तर अय्यर यांनी 32, गुजर यांनी 25 व हिंगणीकर यांनी 22 धावा काढून राजस्थानच्या आशेवर पाणी फेरले. विदर्भाचा हा विजय बादफेरीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कारण त्यानंतर लगेच नागपुरात झालेल्या सामन्यात विदर्भाने रेल्वेचा सहा गड्यांनी धुव्वा उडवून रणजी करंडकाच्या बादफेरीत धडक मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com