रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांसाठी व्हिडिओ कॉलिंग सुविधा

 योगेश बरवड
Monday, 9 November 2020

नागपूर रेल्वेस्थानकावर यापूर्वीच प्रवासीभिमुख अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी सुरू झाली असून, रेल्वेला उत्पन्नही मिळू लागले आहे. त्याच शृंखलेत आता इंटरॅक्टिव्ह इंटरफेस किऑक्सची सुविधा नागपूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नागपूर  ः कितीही वक्तशीरपणा असूदेत रेल्वे प्रवासाला निघताना उशीर होतोच. घाईत मोबाईल चर्जिंग, संबंधितांशी बोलणे राहू जाते आणि प्रवासादरम्यान मनात हुरहूर सुरू असते. ही अडचण दूर करण्याच्या दिशेने रेल्वेने पाऊल टाकले आहे. खासगी कंपनीच्या सहकार्यातून नागपूर रेल्वे स्थानकावर लवकरच इंटरॅक्टिव्ह इंटरफेस किऑक्स लावले जाणार आहे. त्याद्वारे मोबाईल आणि लॉपटॉप जलदगतीने चार्ज करता येईल. व्हाईस आणि व्हिडियो कॉलिंगसह अन्य सुविधा उपलब्ध होईल. प्रवासी सुविधेत भर पडेलच, शिवाय रेल्वेला वार्षिक स्वरूपात निश्चित उत्पन्नही मिळेल.

नागपूर रेल्वेस्थानकावर यापूर्वीच प्रवासीभिमुख अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी सुरू झाली असून, रेल्वेला उत्पन्नही मिळू लागले आहे. त्याच शृंखलेत आता इंटरॅक्टिव्ह इंटरफेस किऑक्सची सुविधा नागपूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भुवनेश्वरच्या एम. एस. नेक्साईट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. करारानुसार नागपूर स्टेशनवर विविध १० ठिकाणी हे यंत्र लावले जाईल.

या यंत्रणांमुळे प्रवाशांना बरेच उपयोगी फिचर्स उपलब्ध होतील. स्टेशनवर मोबाईल, लॉपटॉप चार्जिंगची सुविधा असली तरी दुर्लक्ष होताच मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. अशा स्थितीत सुरक्षित चार्जिंगचा पर्याय उपब्ध होईल. विशेष म्हणचे फार गतीने चार्जिंगची प्रक्रिया होईल. शिवाय आप्तेष्टांशी संपर्क साधून बोलणेही करता येईल.

"मधे आलास तर, तिला पेट्रोल टाकून जाळेन:; युवती आणि तिच्या भावाला दिली धमकी

त्यासाठी व्हाईस व व्हिडिओ अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करता येईल. प्रथमच येणाऱ्या प्रवाशांना शहराविषयी माहिती नसते. नव्य यंत्रणेत गुगल मॅपची सेवाही आहे. यामुळे नेमका रस्ताही शोधता येईल. अडचणीच्या प्रसंगी रुग्णवाहिकेशीही संपर्क साधता येईल. ही संपूर्ण व्यवस्था प्रवाशांसाठी निःशुल्क असेल. बहुउपयोगी सुविधेसह रेल्वेला संबंधित कंपनीकडून वार्षिक ३ लाख रुपयांचे उत्पन्नही मिळेल.

नववी अभिनव कल्पना

भारतीय रेल्वेने तिकीट विक्रीशिवाय उत्पन्न वाढविण्यावर भार दिला आहे. प्रवासी सुविधेत भर टाकणाऱ्या आणि उत्पन्नही देणाऱ्या अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून सातत्याने अभिनव संकल्पनांचा शोध घेऊन कंपन्यांसोबत करार केले जात आहेत. चालू वर्षात करार करण्यात आलेली ही नववी अभिनव कल्पना ठरली असून, हा सर्वाधिक किमतीचा करार ठरला आहे. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य अशा नवीन करारांसाठी सतत प्रयत्नशील आहेत. 

संपादन ः अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video calling facility for passengers now at the railway station