'संत समाजासाठी समर्पित, तर साधू लुबाडणारे असतात'

vijay wadettiwar criticized sadhu in nagpur
vijay wadettiwar criticized sadhu in nagpur

नागपूर : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित आहे, तर संत म्हणजे दिशादर्शक आहे. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे, यावर आजही मी ठाम आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 'साधू हे नालायक असतात', असे वक्तव्य असलेला त्यांचा एक व्हिडिओ पुढे आला होता. त्यावर आचार्य तुषार भोसले यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबतच आज वडेट्टीवार बोलत होते.

अनेक साधूंनी स्वतःची कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली. त्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. मात्र, तुकडोजी महाराजांनी आपली संपती दान केली. गाडगे महाराजांनी समाजाला दिशा दिली, ही संताची शिकवण आहे. साधू हे स्वतःचे साधवणारे असतात; संत हा समाजासाठी समर्पित असतो, यावर मी ठाम आहे, कुणाला कितीही टीका करु दे, असेही वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.

ओबीसी समाजाने राम रहीम, आसाराम यांसारख्या साधूच्या मागे लागू नये. संताची शिकवण घेऊन समाजाला पुढे न्यावे. कलबुर्गीचा खून करणारे कोण होते, याचाही विचार करावा लागेल. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, समाजातील अनिष्ठ रुढीविरुद्ध जर प्रहार करण्यासाठी विचार मांडत असेन आणि त्याचा खून होत असेल तर आणि तोच विचार मी आजही मांडतो, असेही ते म्हणाले. समाजात अंधश्रद्धा पसरवून धर्मांधामध्ये गुंफून समाजाचे शोषण करणारे साधू मनोरुग्ण असतात. त्यांचा आम्ही विरोध करतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता, ज्या कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करत असेल त्याच कुटुंबातील लोकांना चिंता असते. त्यांनी तक्रार द्यावी. त्याची इतरांनी चिंता करू नये. केवळ राजकारण म्हणून एखादा विषय घेऊन जाणार असेल तर चौकशीअंती जे होईल ते होईल. मात्र, राजकारण म्हणून जर हा विषय कोणी पुढे नेत असेल, कुणाची प्रतिमा मालिन करत असेल तर ते योग्य नाही. मध्ये एका मंत्र्यावरही असाच आरोप झाला होता, असे वडेट्टीवार म्हणाले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com