special talent : पोलिस जगतात विनोद यांची आहे ‘रफी’ म्हणून ओळख; खाकी वर्दी गाजवते मैफिली

Vinod Kamble performed many concerts
Vinod Kamble performed many concerts

नागपूर : पोलिस म्हटला की भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांच्यातही उत्तम कलावंतही दडला असू शकतो. हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई विनोद कांबळे यांनी आपल्या दर्जेदार गायकीने संगीताच्या अनेक मैफिली गाजवून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अनेकांची वाहवा मिळविली आहे.

४८ वर्षीय विनोद हे लहानपणापासून गाणे व संगीताचे शौकीन असले तरी, घरी घडलेल्या एका घटनेनेच त्यांना गायक बनविले. मोठे कुटुंब आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे चतुर्थ कर्मचारी राहिलेले त्यांचे वडील आणि आईमध्ये नेहमीच छोट्यामोठ्या कारणांवरून भांडणे व्हायचे. असेच एकदा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर वडिलांनी रागाच्या भरात घरातील रेडिओ फेकून दिला.

तुटलेल्या अवस्थेत रेडिओवर महंमद रफी यांचे गाणे सुरूच होते. वडिलांनी मारल्याने आई रडू लागली. मात्र, त्याही परिस्थितीत तिने अश्रू पुसत अवघ्या पाच-सहा वर्षांच्या विनोदचे त्या गाण्याकडे लक्ष वेधले. आणि तेव्हापासून विनोद हे रफी साहेबांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी रफींची गाणी बारकाईने ऐकली. त्यांच्यासारखे गाण्याचा प्रयत्न केला. कठोर मेहनत व नियमित सरावाअंती ते अल्पावधीतच उत्तम गायक बनले.

शाळा, कॉलेजमध्ये छोटेमोठे कार्यक्रम गाजवीत असतानाच ते पोलिस विभागात नोकरीला लागले. मात्र, ड्युटीच्या व्यस्ततेनंतरही त्यांनी आपला शौक सोडला नाही. नियमित रियाज आणि व्हिडिओ व टीव्हीवरील रफीचे गाणे ऐकून त्यांनी आपली गायकी पूर्णत्वास नेली. विनोद यांनी ‘गोल्डन मेमरी’ ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आतापर्यंत विदर्भातील अनेक कार्यक्रमांमध्ये रफींची गाणी सादर करून पुरस्कार व वाहवा मिळविली आहे.

पोलिसांचा कार्यक्रम असेल आणि तिथे विनोद यांचे गाणे नसेल असे क्वचितच घडले. पोलिस जगतात ‘रफी’ म्हणून ओळखले जाणारे विनोद यांनी कुणाकडूनही शास्त्रीय संगीत किंवा तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. विशेष म्हणजे यातील सूर, ताल व अन्य बारकावे त्यांना अवगत आहेत.

कला जोपासण्याचा माझा प्रयत्न
आर्थिक परिस्थितीमुळे गुरूंकडून शास्त्रीय पद्धतीने संगीत शिकू शकलो नाही. तरीही आतापर्यंत मी जे काही कमावले, त्यावर समाधानी आहे. भविष्यातही ही कला जोपासण्याचा माझा प्रयत्न आहे.
- विनोद कांबळे,
पोलिस शिपाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com