"गाढवाचे लग्न' फेम गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाईं नारायणगावकर "जीवनगौरव' पुरस्कार घोषित

gulabbai
gulabbai

नागपूर : ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार घोषित केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दै. "सकाळ'ने जीवनगौरव पुरस्कार कधी, असे वृत्त प्रकाशित केले होते.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. तमाशा क्षेत्रात लावणी नृत्यांगना म्हणून दुमदुमलेले नाव. वयाच्या 14 व्या वर्षांपासून पायात घुंगरू बांधून रसिकांच्या मनावर हुकूमत गाजवली. "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' ही लावणी अजरामर केलेल्या विठाबाईंना केवळ पोटासाठी नव्हे, तर कलेसाठी, लावणीला नृत्याचा दर्जा देण्यासाठी नाचल्या. तमाशातून समाजप्रबोधन त्यांनी केले.

राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करताना विठाबाईं नारायणगावकर यांच्या नावाने "जीवनगौरव' पुरस्कार योजना सुरू केली आहे. मात्र, मागील सरकारने एक वर्ष पुरस्कार दिला. यानंतर हा पुरस्कार थंडबस्त्यात जाणार, अशी अवस्था दिसत असताना दै. "सकाळ'ने जीवनगौरव पुरस्कार कधी, असे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नुकतेच ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार घोषित केला.

सन 2018-19 साठीचा हा पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित केला. रुपये 5 लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली. "गाढवाचं लग्न' या महाराष्ट्रभर गाजलेल्या वगनाट्यात गुलाबबाई यांनी लावणी केली होती. विठाबाईप्रमाणेच गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षांपासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिले. राधाबाई बुधगावकर पार्टीमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बबूताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता-घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शनवरून उत्तम कला सादर करून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्‍यावर घेतल्या. "गाढवाचं लग्न' या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गुलाबबाई संगमनेरकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तावडेंचे फोल ठरलेले आश्‍वासन
विद्यमान सरकारने पूर्ण करावे

लोककलेची सेवा करणाऱ्या विठाबाईंच्या सेवेचे मोल लक्षात घेता, त्यांना 1990 मध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते सुवर्णपदक प्राप्त झाले. दोन वेळा त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदके मिळाली होती. विठाबाईंना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी "विठा' हे संगीत नाटक लिहिले आहे. अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या होत्या. अ. भा. दलित नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष होत्या. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा अष्टपैलू कलावंत विठाबाई नावाच्या "ठिणगी'ची जाणीव लक्षात घेता, स्मारकाची घोषणा केली. सात एप्रिल 2015 रोजी माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, जयदीश मुळीक, भीमराव तापकीर या आमदारांनी विठाबाईंच्या स्मारकाचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित केला होता. 2016 मध्ये तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यातील 2 एकर जागा स्मारक उभारण्यासाठी देण्यात येणार असून, कार्यवाही सुरू आहे, असे लेखी उत्तर कळविले होते. परंतु, तावडे यांचे लेखी दिलेले आश्‍वासन फोल ठरले. जलसंपदा राज्यमंत्री विनय शिवतारे यांच्याकडे नारायणगावचे सरपंच योगेश पोटे आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी पत्रव्यवहार करून ही जागा देण्याची मागणी केली होती. परंतु, पुढे कार्यवाहीला ब्रेक लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने ते पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com