आणि पहाता पाहता आशेवर फिरले पाणी, दुष्काळात आला `तेरावा महिना’

मनोज खुटाटे | Tuesday, 25 August 2020

महामारीच्या काळात उधारी व कर्ज काढून महागडे  बीयाणे, औषधे विकत घेऊन शेतात पेरले. हिरवीगार रोपटी शेतात डोलू लागली. शेतकऱ्याला दुःखाचा विसर पडला. त्याच्या डोळ्यात हिरवी स्वप्ने फुलू लागली. आणि मग कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक ! सोयाबीनची रोपटी पिवळी पडून वाळू लागली.      

जलालखेडा (जि-नागपूर) : यंदा कोरोनाने ‘चारी मुंड्या चित’ केले असताना शेतीचा हंगाम आला. शेतकऱ्याने आजाराची पर्वा न करता पेरणीसाठी शेत तयार केले. हाती पैसा नसताना त्याने छातीला माती लावून हिंमत केली. महामारीच्या काळात उधारी व कर्ज काढून महागडे  बीयाणे, औषधे विकत घेऊन शेतात पेरले. हिरवीगार रोपटी शेतात डोलू लागली. शेतकऱ्याला दुःखाचा विसर पडला. त्याच्या डोळ्यात हिरवी स्वप्ने फुलू लागली. आणि मग कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक ! सोयाबीनची रोपटी पिवळी पडून वाळू लागली.      

अधिक वाचाः लग्न करतो म्हणाला, ऐनवेळी दिला दगा

ऐन शेंगा भरण्याच्या स्थितीत आल्यावर आली आफत
नरखेड व काटोल तालुक्यात ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक सोयाबीन पीकावर तांबेरा (येलो मोझॅक) व खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडाची पाने पिवळी पडून झाडे वाळत आहे.  शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पाहणी करून कृषी आणि महसूल विभागाने गावनिहाय सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाला त्वरित पाठवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सोयाबीनचे पीक हातचे गेले, आता शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कापसाच्या होणाऱ्या हालापायी यावर्षी शेतकऱ्यांनी त्यांचा कल सोयाबीनकडे वळविला. सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी तांबेरा व खोडकिडीच्या नियंत्रणसाठी महागडे कीटकनाशके व बुरशीनाशकांची टप्याटप्याने फवारणी केली. परंतू सोयाबीन ऐन शेंगा भरण्याच्या स्थितीत आल्यावर तांबेरा व खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनची पाने वाळून झाडे नष्ट होत आहेत.  याबाबत नरखेड व काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. तरी पण शासनस्तरावर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे कार्य सुरू झालेले नाही.

अधिक वाचाः हे विघ्नहर्ता, बाप्पा ! आतातरी कापसाचे पैसे खात्यात जमा होऊ द्या ना !
 

कारणाचा शोध घेऊन अभ्यास करण्याची गरज
कृषी विभागाने सोयाबीन नुकसानीचे गावनिहाय सर्वेक्षण, बियाण्याची जात, पेरणीची तारीख, विमा काढला का, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर याची गावनिहाय यादी करून शासनाला त्वरित पाठविण्याची गरज आहे. सोबतच सोयाबीन दरवर्षी शेंगा भरतानाच नेमके पिवळ्या पडून वाळत असल्याने याच्या मागच्या मुख्य कारणाचा शोध घेऊन अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी संशोधन करणे आता आवश्यक झाले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने उभे राहून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. पीक विम्याचा अनुभव वाईट असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उरविला नसल्यामुळे त्यांच्या आशा आता शासनाच्या मदतीवर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला, त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई भरून मिळून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

नुकसानीचा सर्वे करण्याचा आदेश नाही
नरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये आज ( ता. २३ ) काटोलचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक शेतकरी देखील होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण सध्या तरी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे कोणतेच आदेश नसले तरी सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्याकडून नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

हेही वाचाः दिलासादायक! कामठीत ८५ टक्के बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात
 

कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे कीडीचा प्रादुर्भावः सरोदे
काटोलः मागच्या वर्षी कापसाच्या उत्पादनात घट व कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी सोयाबीन या पिकांकडे वळले. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी सोयबीनचा पेरा अधिक केला. सुरवातीला बहुतांश शेतकऱ्याचे सोयबीन बियाणे बोगस निघाले, ते उगवले नाही. त्यामध्ये त्यांची फसगत झाली. कृषी विभागात तक्रार करूनसुद्धा काही झाले नाही. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुसरीकडे सुरुवातीला पावसाची सुरवात चांगली झाली. सोयबीन पिकांची वाढ उत्तम होवून फुलावर आले. आता शेंगांमध्ये दाणे भरण्याची वेळ आली, तर येलो मोझॅक वायरस खोडकिडीचा प्रादुर्भाव होवून सोयबीन पिवळे पडत आहे. कृषीविभाग गाढ झोपेत आहे. सततच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतजमिनी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या आहेत, त्यांच्या सोयबीन पिकावर परिणाम झाला. शेतकरी दुहेरी संकटात सापडला. सोयाबीन उत्पादन घट होणार शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येणार, हे निश्चित. लाडगाव येथील रामभाऊ राऊत यांच्या शेतातील  सोयाबीन पिकाची पाहणी केली असता सोयाबीनवर आलेल्या रोगाने शेतकरीवर्गाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, हे निर्दशनास आले. शासनदरबारी याची दखल घेण्यात यावी, शासनाने शेतकऱ्यास मदत करावी, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांनी व्यक्त केले. यावेळी मंगेश मानकर, प्रशांत रिधोरकर, बालू येणुरकर, गंगाधर राऊत, वंजारी, शेंद्रे उपस्थित होते.

संपादन  : विजयकुमार राऊत