गावात पाणी शिरेल याची कल्पनाही नव्हती; व्यथा पूर पीडितांची

संदीप गौरखेडे
Friday, 20 November 2020

मेलेली जनावरे जेसीबीने खड्डा खोदून गाडण्यात आले. त्यामुळे रोगराई झाली नाही. काही लोकं बिल्डिंगच्या छतावर होते. घरात गाळ आणि मोठमोठे साप होते. भीती खूप वाटत होती, पण काय करणार? महिनाभर नळाचे पाणी मिळाले नाही. पाच दिवस अंधारात काढले.

कोदामेंढी (जि. नागपूर) : कन्हान नदीच्या काठावर वसलेले पाचेकशे लोकवस्तीचे चेहडी गाव. दोन दिवस पुराने गावाला वेढले होते. सत्तर ते अंशी घरात माणूसभर पुराचे पाणी होते. पुरामुळे घरे क्षतिग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले. चेहडी गावात जाताच सहाआठ तरुण आणि युवक जमले आणि पूरपरिस्थितीचा जणू पाढाच वाचू लागले. पाणी वाढेल असेच संकेत प्रशासनाने दिले, मात्र गावात पाणी शिरेल अशी काही कल्पनाच नव्हती, तसा काही इशारा देण्यात आला नव्हता, असे येथील ग्रामस्थ सांगू लागले.

रात्री अडीच वाजताची वेळ, ऑगस्ट महिन्यात आलेला पूर, ग्रामपंचायतच्या चपराश्‍याला फोन आला. शेतशिवारात कुणाची जनावरे असतील ती त्यांना हलविण्यास सांगितले. पुराचा लोंढा वाढला. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. पश्चिमेकडून धार फुटली आणि एकदम गावात पाणी शिरले. हळूहळू पहाट होत गेली. उघड्या डोळ्यांनी गावकरी पूर बघत होते. गावाभोवताल पुराचा वेढा होता. या मोडीवर बोट लागली होती. रोसेलो शाळेत आम्हाला हलविले. संपूर्ण गाव खाली केले. काही लोक नातेवाईकाकडे गेले.

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

गावातील काही बाया बोटीत बसल्या, तेव्हा चक्कर आला. लहान मुलं रडत होती. सगळीकडे पुरच पूर होता. लहान मुलांना आणि बायकांना बोटीत बसविले. पूर ओसरल्यानंतर तीन दिवसांनी गावात आल्यानंतर गावकरी सांगतात. एक महिना गावात उदासी होती. गावात आलो तेव्हा स्मशानशांतता होती. गावात, घरात गाळ साचलेला होता. गाळात बरेच लोकं फसले. भीती वाटत होती.

मेलेली जनावरे जेसीबीने खड्डा खोदून गाडण्यात आले. त्यामुळे रोगराई झाली नाही. काही लोकं बिल्डिंगच्या छतावर होते. घरात गाळ आणि मोठमोठे साप होते. भीती खूप वाटत होती, पण काय करणार? महिनाभर नळाचे पाणी मिळाले नाही. पाच दिवस अंधारात काढले. वीजतारा, खांब कोलमडून पडले होते. आयुष्यात इतका पूर आणि नुकसान पाहिले नसल्याचे गावकरी सांगत होते. त्यांच्या बोलण्यातील आवेश उफाळत होता.

हेही वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

अद्याप कसलीही मदत नाही
माझ्या एकूण ८० जिवंत शेळ्यांपैकी ५७ शेळ्या पुरात वाहून गेल्या तर काही दूषित पाण्याने मरण पावल्या. अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. जनावरांचा चारा पण वाहून गेला. पंचनामा, पीएम रिपोर्ट सगळे झाले. पण अद्याप कसलीही मदत मिळाली नाही.
- संजय ठाकरे, शेळीपालक

शासनाच्या सर्व्हेनुसार

  • गाव : चेहडी
  • एकूण घरांची पडझड : २५ घरे
  • शेतपिकांचे नुकसान : ६५.५० हेक्टर आर क्षेत्रफळ
  • पुरात वाहून गेलेली जनावरे : २५९ शेळ्या

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We had no idea that water had seeped into the village