तीन हजार योद्धे बाधित, महापौरांनी घातली कोणती भावनिक साद? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर
Tuesday, 15 September 2020

४५ हजार बाधित असले तरी यातील ३४ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी व्हीडीओ संदेशात नमुद केले. मात्र, त्याचवेळी महानगरपालिका तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. महानगरपालिकेतच दीडशेववर अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. मेडिकलमध्ये २५०० तर मेयोमध्ये शंभरावर कोरोनायोद्धा पॉझिटिव्ह आले आहेत.

नागपूर : महापालिका, मेडिकल, मेयोत कोरोना रुग्णांना सेवा देणारे तीन हजार कोरोनायोद्धे बाधित झाले आहेत. त्यामुळे कोव्हिड विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने तयार केलेल्या नियमांचे पालन करण्यासोबतच स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना केले. 

महापौर संदीप जोशी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून नागरिकांना भावनिक साद घातली. ४५ हजार बाधित असले तरी यातील ३४ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी व्हीडीओ संदेशात नमुद केले. मात्र, त्याचवेळी महानगरपालिका तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

पालकमंत्र्यांना महिनाभरातच कशाचा पडला विसर? वाचा सविस्तर -

महानगरपालिकेतच दीडशेववर अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. मेडिकलमध्ये २५०० तर मेयोमध्ये शंभरावर कोरोनायोद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणेला कसरत करावी लागत असल्याचे ते म्हणाले. या बिकट स्थितीतही महानगरपालिकेने रुग्णवाहिकांची संख्या ६५ पर्यंत वाढविली. शववाहिका २४ आहेत. खासगी कोव्हिड हॉस्पीटलची संख्या १५ वरून ४५ केल्याचे ते म्हणाले. 
 
लॉकडाऊनसंबंधात बोलणारेच विनाकारण फिरतात
शहरात अनेकजण अंगावर ताप काढून घरीच उपचाराविना राहतात. ऑक्सीजन लेवल कमी झाल्यानंतर धावाधाव केली जात आहे. त्याचवेळी काहीही झाले नसताना केवळ भीतीने काहीजण रुग्णालयांत दाखल होऊन बेड राखून घेतात. या दोन प्रकारातील लोकांशिवाय शहरात विनाकारण फिरून सोशल मिडियावर लॉकडाऊनची मते मांडणारे बरेच जण आहेत. त्यापेक्षा नियम पाळा, स्वयंशिस्त लावा तरच कोरोना आटोक्यात येईल, असेही ते म्हणाले. 
 
खाजगी रुग्णालयात बेड वाढविण्यास अडचणी  
 
खासगी रुग्णालयात अजूनही नॉन कोव्हिड रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तेथील बेड्‌सची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. ही सर्व परिस्थिती नागरिकांना अवगत होणे गरजे आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर शिस्तच महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनो, स्वत: शिस्त पाळा. विनाकारण फिरणे टाळा. कोरोनाविरुद्ध संघटित लढा देऊन कोरोनाला पळवा, असे मार्मिक आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what emotional call did the mayor make? Read detailed