हे काय आणखी वाढलंय पुढ्यात? रानडुकरे जोमात, शेतकरी कोमात !

सतिश तुळस्कर
Wednesday, 21 October 2020

बऱ्यापैकी बरसलेला मॉन्सून परतीच्या वाटेला लागला खरा, मात्र जाता जाता अतिवृष्टी देऊन गेला आणि तोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीक राखरांगोळी करून गेला. अशातच काही शेतकऱ्यांनी धानाच्या पिकांची लागवड केली.

उमरेड (जि.नागपूर) : शेती तसाही आजच्या काळात एक जुगाराचा खेळ ठरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित प्रश्‍न, शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, त्यातच वन्यप्राण्यांचा उपद्रव अधूनमधून शेतकऱ्यांच्या जीवावर उठत असतात. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील शिवापूर या गावातील शेतकऱ्यांसोबत घडला आहे. या शिवारातील  अख्खे पीक रानडुकरांनी फस्त केल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क धान पिकांतून ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ  आली आहे.

अधिक वाचाः  पुरुष आला तर नवरा, महिला राखीव आले तर पत्नी !

शिवापूरच्या शेतकऱ्याने फिरविले पिकावरून ट्रॅक्टर
 उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या सीमा या तालुक्यातील बऱ्याच शेतजमिनीला लागून असल्यामुळे येथे वारंवार होणाऱ्या वन्यजीवांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. अनेकदा शेतकऱ्यांवर होणारे वाघाचे हल्ले असो किंवा पाळीव जनावरांवर होणारे वाघांचे व जंगली श्वापदांचे हल्ले अथवा शेतमजुरांवर झालेले वाघांचे हल्ले या सर्व प्रकाराने आधीच शेतमजूर धास्तावले असतात. त्यामुले ते जंगल परिसराच्या आसपाच्या शेतात मजुरीला जाणे टाळतात. परिणामी शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. त्यांना स्वतःचा व परिवाराचा उदरनिर्वाह चालविणे जिकिरीचे झाले आहे.यंदा कोरोनामुळे परिस्थितीने आधीच सारे हवालदिल झाले आहेत. सर्वसामान्यांपासून ते शेतकरी वर्गाला त्याचा मोठा फटका बसलाय. बऱ्यापैकी बरसलेला मॉन्सून परतीच्या वाटेला लागला खरा, मात्र जाता जाता अतिवृष्टी देऊन गेला आणि तोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीक राखरांगोळी करून गेला. अशातच काही शेतकऱ्यांनी धानाच्या पिकांची लागवड केली. त्यांना आस लागली होती की सोयाबीन आणि कापूस जरी गेले तरी उभे असलेले भरीस आलेले धानाचे पीक हे पोटाचा प्रश्न सोडविण्यास मदत

अधिक वाचाः अखेर ‘तो’ पश्‍चातापदग्ध अंतकरणाने म्हणाला, साहेब, माफ करा हो चूक झाली !
 

झाला ७० हजाराचा खर्च, हाती आले तणस
उमरेड तालुक्यात येणाऱ्या शिवापूर सरांडी गावातील जवळपास  २० ते २५ शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकात रानडुकरांचा रात्रीस खेळ चालत पिकाचे नुकसान केले आहे. ३० ते ४० डुकरांचे कळप दररोज रात्री शेतात येतात आणि पिकांची नासधूस करून जातात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मंगळवारी सकाळी माजी आमदार सुधीर पारवे यांनी अशाच एका शेताला भेट दिली. तिथे दररोज रात्री रानडुकरे जाऊन शेतमालाची नासाडी करतात. हे शेत वसंता सदाशिव तुरक (राहणार हुडकेश्वर नागपूर )यांचे असून कृष्णा रमेश येवले (राहणार शिवापूर )हे शेताची देखरेख करतात. त्यांनी शेतातील ३.५ एकरात वायएसआर धानाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना लागवडीचा एकूण खर्च ७० हजार रुपये आला. डुकरांनी  हातातोंडाशी आलेले धानाचे पीक  जमीनदोस्त केल्यामुळे आज शेतकऱ्यावर त्या धानाच्या पिकात ट्रॅक्टर फिरवून चिखलणी करण्याची वेळ आली. याशिवाय सुरेश  बापूराव चौधरी, उमेश भोयर, निखिल भोयर, मंगेश नवघरे, कृष्णा येवले, रमेश नवघरे, अनिल राऊत, राजू इंगोले, विठ्ठल राऊत इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतातसुद्धा डुकरांची नासाडी करून ३० -३५ हेक्टरचे नुकसान केले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

पंचनामा करण्यास अडचण जाणार
शेतकऱ्याने शेतातील धानाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याची माहिती मिळाली. वनविभागाचे कर्मचारी उद्या आले असते आणि पंचनामे करून नुकसानभरपाईची तरतूद केली असती, परंतू ट्रॅक्टर फिरविल्यामुळे पंचनामा करण्यास अडचण जाणार आहे.  विशेषतः नुकसान भरपाईची मागणी वनविभागाकडे न करता जर शेतकरी कृषी विभागाकडे करतील तर त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळेल. कारण पिकाची नासाडी होण्यास अतिवृष्टीसुद्धा जबाबदार आहे.   
-वैष्णवी जरे
दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What's next? Cows in full swing, farmers in coma!