भाजीच्या गंजावरचे झाकण उघडले आणि...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

काही कर्मचारी नाक मुरडत जेवणासाठी गेले. मात्र एका वाढणाऱ्या महिलेने भाजीचा गंज उघडला. तर त्यात मटणाचा खमंग आला आणि मटणावर ताव मारून काही कर्मचारी तहसील कार्यालयात परतले.

हिंगणा (जि. नागपूर) : जेवणावर प्रत्येकाचेच प्रेम असते. त्यातल्यात्यात आवडीचे जेवण असले की सोने पे सुहागा. अगदी असाच अनुभव निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना आला. रोज-रोज डाळ भाजी आणि वांग्याची भाजी खाऊन कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना भाजीवरचे झाकण उघडल्याबरोबर मटणाचा रस्सा दिसला आणि या सर्व कर्मचाऱ्यांनी मटणावर यथेच्छ ताव मारला. या मटणाची चर्चा तहसील परिसरात चांगलीच रंगली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जवळपास दोनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हिंगणा तालुक्‍यात 7 जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 23 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील कार्यालयासह इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहेत. शुक्रवारी तहसील कार्यालयात सीलिंगची प्रक्रिया सुरू होती. कर्मचारी कामात व्यस्त होते. सकाळी नाश्‍ता झाला होता. दुपारी तीनदरम्यान जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
जेवणात नेहमीच डाळ भाजी व वांग्याची भाजी असते. यामुळे कर्मचारी जेवण्यासाठी जाण्यास उत्सुक नव्हते. काही कर्मचारी नाक मुरडत जेवणासाठी गेले. मात्र एका वाढणाऱ्या महिलेने भाजीचा गंज उघडला. तर त्यात मटणाचा खमंग आला आणि मटणावर ताव मारून काही कर्मचारी तहसील कार्यालयात परतले.

सविस्तर वाचा - गर्भात बाळ अन्‌ एमपीएससीचा पेपर, वाचा ही कहाणी

जेवणात मटण असल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि ज्यांची जेवायची इच्छा नव्हती, तेही कर्मचारी मटणावर ताव मारण्यासाठी गेले. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त झाली व मटणाची भाजी कमी पडली. अखेर काहींना एकाच फोडीवर समाधान मानावे लागले. तर काहींना साधे जेवणच मिळाले. मटणाच्या भाजीची चर्चा पानठेल्यावरही मस्त रंगली. काहींना मटणावर यथेच्छ ताव मारता न आल्याने ते मात्र नाराज होते.

नववर्षांचे प्रशासनाकडून गिफ्ट

निवडणूक कामात आतापर्यंत साधे जेवण मिळत असताना अचानक मटण मिळाले. यामुळे निवडणूक विभाग व तालुका प्रशासनाने निवडणुकीच्या कामात लागलेल्या कर्मचाऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली. हीच प्रथा इतर निवडणुकीतही सुरू व्हावी, असे मतही नेकांनी व्यक्‍त केले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when election emploies saw meat in lunch...