पक्ष वाढविण्यासाठी ही नामी संधी; वाटाघाटीवर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल वाचा...

When negotiating with the Congress, we will ask for an equal share
When negotiating with the Congress, we will ask for an equal share

नागपूर : आज राज्यात आपली स्थिती चांगली आहे. आपल्याकडे सत्ता आहे. गृहमंत्रालय आणि कामगार, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ही चांगली नामी संधी आपल्याला आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे. काँग्रेससोबत वाटाघाटी करताना आपण आता बरोबरीचा वाटा मागू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शहरातील जय जवान जय किसान संघटनेचे प्रमुख, आंदोलक नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांच्या पक्षात स्वागताच्या वेळी प्रफुल्ल पटेल बोलत होते. पवार यांच्या येण्याने राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले.

पक्षाचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघेही निष्क्रिय आहे, अशी ओरड कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. यावरून शहर आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये यापूर्वी वादावादीही झाल्याचे काही कार्यकर्ते सांगतात. ज्येष्ठ नेते पटेल यांचा दौरा झाल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघांनही बदलविण्याचा हालचाली वेग घेतील, असे सांगण्यात येत आहे.

पवार राष्ट्रवादीत येणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. चर्चा तर येथपर्यंत होती की, ते थेट शहराध्यक्ष म्हणूनच पक्षात येतील. पण, पवारांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी तशी कुठलीही घोषणा ज्येष्ठ नेत्यांनी केली नाही. शहराध्यक्ष कोण, याचे सस्पेन्स अद्यापही कायम आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेत पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे महापालिकेतही नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न पक्ष निश्‍चितपणे करणार आहे.

श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा

प्रशांत पवार आंदोलक नेते म्हणून ओळखले जातात. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शहरात बरीच आंदोलने केली आहेत. नुकतेच महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. असा नेता शहराध्यक्ष झाल्यास शहरात पक्ष बळकट होईल, असेही मानले जात आहे. पण, यासाठी श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्हाध्यक्ष कोण, देशमुख की बंग?

शहर अध्यक्षाचा निर्णय ज्याप्रमाणे राखून ठेवला आहे, तसाच जिल्हाध्यक्षांचा निर्णय देखील अद्याप झालेला नाही. जिल्हाध्यक्ष पदासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांचे सुपूत्र दिनेश बंग या दोघांच्या नावावर विचार सुरू आहे. परंतु, आजी माजी मंत्रीपुत्रांना अध्यपदाची संधी दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठी या दोन्ही नावांवर विचार करणार नाहीत, असे सांगितले जाते. तिसरेच नाव वेळेवर पुढे येणार, हे निश्चित. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य असलेले माजी आमदार सुनील शिंदे यांचे सुपूत्र सतीष शिंदे यांचा विचार जिल्हाध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यताही पक्षाच्या गोटातून वर्तविली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com