का वाढतयं मम्मींचे हेडॅक ?....मग हे वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

राज्यात शाळा सुरू करण्यावर बरेच मंथन करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शाळा सुरू करू नये अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही अद्याप शाळा सुरू करण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाही.

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळांची पहिली घंटा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. अशावेळी सीबीएसई आणि इंग्रजी शाळांनी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नव्या सत्राचे ऑनलाइन शिक्षण देण्यास शाळांकडून सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळा कमी आणि विद्यार्थ्याच्या आईवरच अधिक घेत असल्याने ऑनलाइन शिक्षण देता-देता विद्यार्थ्यांच्या आईच्या नाकी नऊ येताना दिसून येत आहे.

 

राज्यात शाळा सुरू करण्यावर बरेच मंथन करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शाळा सुरू करू नये अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही अद्याप शाळा सुरू करण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाही. मात्र, राज्यातील सीबीएसई आणि इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांना पुढील सत्र शिकविण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार शाळांनी तयार केलेले शिक्षकांचे व्हीडिओ आणि ऑडिओ पालकांच्या मोबाईलवर दाखविण्यात येतात. हे व्हीडिओ दाखवित पालकांनाच विद्यार्थ्यांची उजळणी घ्यावी लागते. दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणात जे कळले तेच विद्यार्थी शिकतो. त्या उपर जास्त वेळ आपले डोके लावण्यास विद्यार्थी तयार होताना दिसून येत नाही.

 

हेही वाचा : ...या शिळाच सांगतात मातृत्वातील विरत्व

यामुळे शिक्षकांकडूनच व्हीडिओ आणि ऑडिओमध्ये पालकांनी विद्यार्थ्याला त्याबाबत माहिती द्यावी असे सांगण्यात येते. त्यामुळे त्याचीही जबाबदारी मम्मीच्या माथ्यावर येते. या प्रकाराने त्यांच्यावर घर आणि मुलाच्या शिक्षणाची दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. यातूनच बऱ्याच घरी सध्या ऑनलाइन शिक्षणाच्या प्रकाराने मम्मीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येते.

आम्हीच शिकविणार तर पैसे कसले?
ऑनलाइन शिक्षणात शाळांकडून शैक्षणिक साहित्य म्हणून व्हीडिओ आणि ऑडिओ पाठवून हात वर केल्या जातात. मात्र, ते सर्व शिकवून विद्यार्थ्यांकडून उजळणी करवून घेण्याचे काम विद्यार्थ्याच्या आईवर येते. त्यामुळे बऱ्याच पालकांकडून अभ्यासक्रम आम्हालाच शिकवायचा असल्यास शाळांना शुल्क का द्यायचे असा प्रश्‍न आता विचारण्यात येऊ लागला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why growing mummy's headdress?