महिलांनो, न सांगता बाहेर जाऊ नका! अन्यथा पतीचा जीव येईल धोक्‍यात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

पत्नीने एक तर धराबाहेर पडू नये आणि जायचे काम पडलेच तर पतीला सांगूनच जावे असे पूर्वी म्हटले जात होते. आज मात्र हे शक्‍य नाही. स्त्री आणि पुरुष असा भेद न राहल्याने महिलाही घराबाहेर पडू लागल्या आहेत. अशीच एक पत्नी पतीला न सांगता घराबाहेर पडली अन्‌ पतीचा जीव धोक्‍यात आला. 

नागपूर : पत्नीने पतीच्या खिशातून काही पैसे काढले आणि न सांगता मैत्रिणीच्या घरी निघून गेली. काही तासांनी पतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, पत्नी कुठेही सापडली नाही. यामुळे निराश झालेल्या पतीने सासरच्या मंडळीला पत्नी मिळत नसल्याचे कळवले व शोध सुरू ठेवला. मात्र, संशयाचे भूत डोक्‍यात शिरलेल्या सासरच्या मंडळींनी जावयाचीच धुलाई केली. ही घटना आदर्शनगर परिसरातील प्रजापती चौकात घडली. सलीम सुदाबक्ष शेख (38, रा. हसनबाग, मोठ्या मशिदीजवळ) असे जखमी जावयाचे नाव आहे. 

सलीम शेख हा रिक्षाचालक असून, पत्नी व दोन मुलांसह हसनबागेतील मोठ्या मशिदीजवळ राहतो. शनिवारी सकाळी सलीमची पत्नी यास्मिन (25) काही कारणावरून पतीच्या खिशातून एक हजार रुपये रोख घेऊन कुणालाही न सांगता निघून गेली. पतीने सुरुवातीला शोध घेतला असता ती दिसली नाही. काही वेळाने त्याने सासू-सासऱ्यांना माहिती देत पत्नीचा शोध सुरूच ठेवला. दरम्यान, मुलीला सलीमने अपमानास्पद वागणूक दिल्याचा समज सासरच्या मंडळींचा झाला.

क्लिक करा - चालकाला लागली डुलकी अन्‌ घडले आक्रित...

जावयाच्या त्रासापोटी मुलगी घर सोडून निघून गेल्याने संतापलेले सासरे इस्माईल शेख, गुड्डू शेख, रहमान शेख, मुस्तकीन आणि इतर तीन आरोपींनी जावयाला आदर्शनगर परिसरातील प्रजापती चौकात बोलावले. येथे जावयासह त्याचा एक मित्र पोहोचताच दोघांनाही तलवार, विटा व दगडाने मारहाण केली. हा प्रकार पाहून परिसरात खळबळ उडाली.

Related image

जावयाला अर्धमेल्या अवस्थेत मेयोत दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अत्यवस्थ अवस्थेत जावयासह त्याच्या मित्राला मेयोत दाखल करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. दोघांच्याही तक्रारीवरून या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली. इतर आरोपी पसार आहेत.

सविस्तर वाचा - हा तर निघाला 'आंबट'शौकीन; आणखी एक कारनामा उघड, वाचा...

पत्नी म्हणाली, मैत्रिणीकडे होती

सासरच्या मंडळींनी जावई सलीमला जबर मारहाण केली. तीन तासांनी सलीमची पत्नी यास्मिन घरी आली. त्यानंतर पतीला मारहाण झाल्याची बाब लक्षात आली. "मी मैत्रिणीकडे गेली होती.' अशी कबुली तिने वडिलांना दिली. पतीसोबत कसलाही वाद नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. विनाकारण मार मिळाल्याने सलीमने खूप आदळआपट केल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wife went out and other beat her husband