हृदयात दु:खाचा डोंगर असतानाही विविध रूप घेणारे बहुरूपी

राघवेंद्र टोकेकर
Thursday, 23 January 2020

बहुरूपी ही एक जात असून, हेच त्यांचे आडनाव असल्याचे मनोज यांनी सांगितले. राजस्थान, पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये बहुरूपी आढळतात. बहुरूपींची स्वतंत्र जाती संस्था नसल्याने ते नामशेष होत असल्याचे मत मनोज यांनी व्यक्‍त केले.

नागपूर : अन्नासाठी दाही दिशा 
आम्हा फिरविसी जगदिशा 
कृपाळुवा परमपुरुषा 
करुणा कैसी तुज न ये 

श्‍लोकातील या ओळी खऱ्या आर्थाने ज्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास भाग पाडतात त्या बहुरूपी कलासाधकांची ही व्यथा. उपजीविकेसाठी गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन करणारी ही मंडळी हृदयात सदैव दु:खाचा डोंगर घेऊन जगतात. बालगोपाळांना पोट धरून हसायला लावणारा बहुरूपी स्वत:चे पोट भरण्यासाठी काय काय करतो? हे कळले तर समस्यांचे गाऱ्हाणे सांगणारे सर्वसामान्य किती सुखी आहोत, याची जाणीव व्हावी. 

बहुरूपींची कला झपाट्याने लुप्त होते आहे. नव्हे, बहुरूपी नामशेष झाला असेच म्हणता येईल. विविध पुस्तकांत, उदाहरणांत प्रकर्षाने येणाऱ्या बहुरूपी साधकांना आयुष्याचा गाडा समृद्धीच्या दिशेने कधीच हाकता आला नाही. नुकतेच अशा काही बहुरूपींना भेटण्याची संधी नागपूरकरांना मिळाली. प्रत्येकाने त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. मात्र, या हसऱ्या चेहऱ्यामागे किती यातना दडल्या आहेत, याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. 

बापरे! - विवाहित मैत्रिणीला भररस्त्यात केली ही मागणी... वाचा काय झाले नंतर

हा बहुरूपी उपस्थितांना हनुमंताचे दर्शन घडवीत होता. राजस्थानचे मनोज सात सोबत्यांसमवेत नागपुरात आले होते. लोक यायचे अन्‌ सेल्फी काढून निघून जायचे. फावल्या वेळेत मनोज यांच्याशी संवाद साधायचे. राजासाठी गुप्तहेर म्हणून काम करायचो. अनेकदा युद्ध परतवून लावण्याचे काम पूर्वजांनी केले, असे त्यांनी सांगितले. कालांतराने लोकांच्या रुचीनुसार आम्ही सोंग घेत गेलो. आज यमराज, साधू-संन्यासी-फकीर, पोलिस, व्यापारी, अधिकारी, लुळे-पांगळे, जर्जर म्हातारा असे विविध सोंग साकारतो. पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज काढण्यात तरबेज आहोत. शिवाय वाद्ये वाजविणे, नकला करणे, गाणी म्हणण्याचे संस्कार झाले असल्याचे बनोज बहुरूपी म्हणाले. विशेष म्हणजे विविध सोंग दाखविण्यासाठी मनोज बहुरूपी हे जगभर फिरले असून, कलासाधनेत त्यांची सातवी पिढी असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

बहुरूपी ही एक जात असून, हेच त्यांचे आडनाव असल्याचे मनोज यांनी सांगितले. राजस्थान, पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये बहुरूपी आढळतात. बहुरूपींची स्वतंत्र जाती संस्था नसल्याने ते नामशेष होत असल्याचे मत मनोज यांनी व्यक्‍त केले. स्वत:च्या कलासाधनेने देवदर्शन घडविणारे, पुराण-पात्रांचे सोंग घेऊन संगीत, नृत्य, अभिनय कलेतून पुराणकथांचे कथन करणे, भजन-कीर्तन, छोटे-छोटे नाट्यप्रसंग साकारणे व विविध कार्यक्रमांतून आध्यात्मिक करमणूक करून सदाचार व नीतीचा प्रचार करणे अशी त्यांची कामाची पद्धत आहे. शिवाय लोक देतील ती भिक्षा स्वीकारणे हाच मूळ स्वभाव असल्याचे ते म्हणाले. 

बहुरूपी म्हणजे काय?

बहू हा संस्कृत शब्द असून, श्रीपतीभट्टाच्या जोतिषरत्नमाला या प्रसिद्ध ग्रंथात बहुरूपींचा उल्लेख आढळतो. समर्थ रामदासांनीही त्यांच्या भारुडात "खेळतो एकला बहुरूपी रे, पहाता अत्यंत साक्षेपी रे. सोंगे धरिता नाना परी रे, बहुतचि कलाकुसरी रे' असा उल्लेख केला आहे. जटाधारी तपस्वी, गोसावी, साधू इत्यादींचे सोंग घेणारा बहुरूपी असतो. 

Image may contain: 1 person, standing

साधकांसाठी शासनाने पुढाकार घ्यावा 
शासनाने कलासाधकांची दखल घ्यावी. देशात मोठ्या संख्येने लोक कलेच्या सादरीकरणाने स्वत:चे पोट भरतात. शिवाय लोककला जनजागृतीचे माध्यम असल्याने साधकांसाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 
- मनोज बहुरूपी

बहुरूपी कलावंत मेळाव्याचे आकर्षण 
बहुरूपी कलावंत मेळाव्याचे आकर्षण असते. मेळाव्यात येणारा प्रत्येकजण बहुरूपींच्या कलेमुळे प्रफुल्लित होतो. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने बहुरूप्याचे जोगराद स्वागत केले. बहुरूपी संतुष्ट भावनेने घरी परतले याचा आनंद वाटतो. 
- दीपक खिरवडकर, 
संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the government take care of bahurupi