नागपूरकरांना करावी लागणार मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा; हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. 

नागपूर : शहर बसमधील गर्दीची शक्‍यता लक्षात घेता मेट्रोतून प्रवासासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविल्याने मेट्रोने केलेल्या प्रवासी सेवेच्या तयारीवर विरजण पडले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मेट्रो डब्याच्या सॅनिटायझेशनसह कंट्रोल रूम आदी उपाययोजना केल्या होत्या. 

मेट्रोला जुलैपासून प्रवासी सेवेच्या परवानगीची अपेक्षा होती. त्यामुळे मेट्रो डब्याचे निर्जंतुकीकरण आदी केले होते. याशिवाय प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दीच्या मेट्रो स्थानकावरील क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम, स्टेशन कंट्रोल रूमसह विविध खोल्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. परंतु, आज राज्य सरकारने लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे या तयारीवर विरजण पडले. 
मात्र, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया दररोज सुरू राहणार आहे. याशिवाय मेट्रो सुरू होताच पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह कर्मचारी दिसून येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्देशाबाबत जनजागृती केली जाणार असून प्रवाशांची भीती दूर करण्याबाबतही उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...

नागरिकांचीही पसंती मेट्रोला 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोने केलेल्या उपाययोजना शहरातील आपली बसच्या तुलनेत आरोग्यदायी असल्याचे दिसून येत आहे. आपली बसमधील स्वच्छता आदीबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. मेट्रोतून आरोग्यदायी व सुखरूप प्रवासालाच पसंती राहील, असे काही नागरिकांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will have to wait a month