हिंगण्याला जि.प.चे सभापतिपद मिळेल का हो?

sakal
बुधवार, 22 जानेवारी 2020

हिंगणा तालुक्‍यात ज्येष्ठ जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तालुक्‍याला कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला तर तालुक्‍याला ख-या अर्थाने न्याय मिळण्याची शक्‍यता आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपद कॉंग्रेसने आपल्याकडेच ठेवले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन सभापतीपद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंगणा तालुक्‍यात ज्येष्ठ जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तालुक्‍याला कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला तर तालुक्‍याला ख-या अर्थाने न्याय मिळण्याची शक्‍यता आहे.

अधिक वाचा :  दोन नाही तर काहीच नाही; राष्ट्रवादीची भूमीका

कॉंग्रेसच्या आघाडी धर्माकडे लक्ष
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे 30 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 10सदस्य असे संख्याबळ आहे. कॉंग्रेस पक्षाकडे बहुमताचा आकडा असल्याने मंत्री सुनील केदार यांच्या गटाने अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्या गटाकडे ठेवले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी रश्‍मी बर्वे तर उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची वर्णी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपाध्यक्षपद मिळेल, अशी आशा होती. मात्र या आशेवर विरजण पडले.

अधिक वाचा:  एकाशी झाली बोलनी अन दुसरा म्हणाला बस ऑटोत
 

30 जानेवारीला निवडणुकीची शक्‍यता
सभापतीपदासाठी 30 जानेवारीला निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. यात आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन व जलसंवर्धन सभापतीची निवड होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ केदार गटाचे वर्चस्व राहिले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या गटाच्या हातात काहीही लागले नाही. यामुळे या गटाने सभापतीपदासाठी "लॉबिंग' सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन सभापतीपद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता सभापतिपदाच्या निवडणुकीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. नागपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण पाहता गृहमंत्री देशमुख यांनी केदार गटाशी चर्चा करून दोन सभापतीपद किमान राष्ट्रवादीच्या वाट्‌याला खेचून आणावे, अशी चर्चा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला तर हिंगणा तालुक्‍याला सभापतीपद मिळण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, असे चित्र दिसून येत आहे.

अधिक वाचा :  मैत्रिणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन्‌ निघाल्या तलवारी

तीन वेळा सभापतिपदाची लॉटरी
हिंगणा तालुका राजकीयदृष्ट्‌या वजनदार मानल्या जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा गृह तालुका आहे. भाजपच्या जि.प.सदस्य संध्या गोतमारे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. यापूर्वी माजी आमदार विजय घोडमारे यांनीही शिक्षण सभापतिपद उपभोगले आहे. माजी जि.प. सदस्य सुवर्णा खोबे यांचीही महिला व बालकल्याण सभापती म्हणून कारकीर्द पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना माजी जि.प.सदस्य वंदना पाल यांना सलग पाच वर्ष सभापतीपद उपभोगता आले. अडीच वर्ष महिला व बालकल्याण तर अडीच वर्ष शिक्षण सभापतीपद मिळाले होते. यामुळे आता तालुक्‍याला सभापतीपद जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे व दिनेश बंग यांच्या रूपाने मिळावे, अशी चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Hingana get the presidency of Zip?