"भूखंड माफियांनो तुम्हाला सोडणार नाही"; नागपूरच्या पोलिस आयुक्तांचा इशारा; गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार 

will take strict action against plot mafias said CP of Nagpur
will take strict action against plot mafias said CP of Nagpur

नागपूर ः नागरिकांचे भूखंड हडपणाऱ्या भूखंडमाफियांना सोडणार नाही. त्यांना जर कोणी प्रशासकीय अधिकारी दस्तावेज तयार करण्यासाठी साथ देत असेल तर त्यालाही कोठडीत टाकल्या जाईल, असा खणखणीत इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. 

पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी अवैध धंदे करणाऱ्या सर्वांनाचा खबरदारीचा इशारा दिला. शहरातील अवैध दारू विक्री, सट्टा, जुगार, रेती वाहतूक यासह अवैध धंदे करणाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली होती.

शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आता पोलिस सज्ज आहेत. अलीकडेच जिमखाना येथे तक्रार निवारण शिबिरात बहुतांश भूमाफियाशी संबंधित ५० तक्रारी आल्यात. त्यापैकी काही तक्रारींचा लगेच निपटारा झाला तर काहींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. काहींनी आपसात समझोता केल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. 

क्राईम कंट्रोल करण्यासाठी लोकाभिमुख आणि पारदर्शक पोलिसिंग करण्यात येईल. गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार झाले असून प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का, स्थानबद्ध आणि अन्य कारवाईचा धडाका सुरू आहे. त्याच प्रमाणे गुन्हेगारांचा तपास, अटक आणि आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. 

अलीकडे शहरात खून, खुनाचे प्रयत्नासारख्या अनेक घटनांची मालिकाच सुरू होती. अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी मिळाली होती. त्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत आहेत. आरोपींची लवकरच ओळख होईल, असेही अमितेश कुमार म्हणाले. 

आता थेट वाहन जप्त 

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत मोठा दंडाचा फटका बसत नाही तोपर्यंत वाहनचालक सुधारत नाहीत. वाहतूक पोलिसांचे १० पथके तयार करण्यात आले आहेत. आता फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास आणि डार्क फिल्म लावल्यास थेट वाहन जप्त करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रेड सिग्नल जंप करणाऱ्यांवर चालान कारवाई करण्यात येणार आहे. 

सायबर क्रिमिनलवर ‘वॉच’ 

सायबर क्रिमिनल्सवर पोलिसांची नजर असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सायबर पोलिस स्टेशन तयार होत आहे. नागपुरातील पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्लीतून हायटेक प्रशिक्षण घेतले असून सायबर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल, असे आयुक्तांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com