प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे...

रविवार, 14 जून 2020

त्याने दार ठोठावत निकिताला अनेकदा हाक दिली; मात्र दार उघडले गेले नाही. मोबाईलवर फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. अतुलने बाथरूमच्या खिडकीतून घरात डोकावण्याचा प्रयत्न केला असता निकिता शॉवरला ओढणी बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली.

नागपूर : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या युवकाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेयसीसोबत लव्ह मॅरेज केले. काही दिवसांतच पत्नी गर्भवती झाली. मात्र, अचानक तिचा गर्भपात झाला. त्यामुळे ती सारखी तणावात राहत होती. शेवटी तिने टोकाचे पाऊल उचलले आणि एका प्रेमकथेचा शेवट झाला. 

अतुलकुमार चौकसे हे नामांकित धावपटू असून सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांचे निकिता अतुलकुमार चौकसे (वय 21, महिला महेश कॉलनी, इमामवाडा) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनीही भविष्याचा विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. अतुल आणि निक्‍की या दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना एकमेकांची ओळख करून दिली. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे लग्न करून देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघेही निराश झाले आणि तणावात होते. त्यानंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनीही 31 जानेवारीला कोर्ट मॅरेज केले. दोघांच्याही कुटुंबीयांना नाते स्वीकारण्यास तयारी दर्शविली नाही. त्यामुळे दोघांनीही आपला राजा-राणीचा संसार थाटला. महिन्याभरानंतर दोघांच्याही कुटुंबीयांची समजूत घालण्यात आली. यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने फेब्रुवारीत पुन्हा आर्य समाज पद्धतीने त्यांचे लग्न झाले. अतुलच्या बयाणानुसार, निकिताने तणावातून आत्महत्या केली. निकिता काही महिन्यांची गर्भवती होती. मात्र, काही कारणाने तिचा गर्भपात झाल्याने ती तणावात होती. शनिवारी सायंकाळी 5 वाजता सुमारास अतुल कामावरून घरी परतला. दरवाजा आतमधून बंद असल्यामुळे त्याने बेल वाजविली. निकिताने दरवाजा उघडला नाही.

यामुळे त्याने दार ठोठावत निकिताला अनेकदा हाक दिली; मात्र दार उघडले गेले नाही. मोबाईलवर फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. अतुलने बाथरूमच्या खिडकीतून घरात डोकावण्याचा प्रयत्न केला असता निकिता शॉवरला ओढणी बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर अतुलने घरमालकाला बोलावून दरवाजा तोडला आणि निकिताला खाली उतरवले. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी (ता. 13) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. यामुळे निकिताने नेमक्‍या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा : सव्वादोन लाख रुपये वीजबिल पाहून लागला 'करंट' 

गर्भपात झाल्यामुळे नैराश्‍य 
निकिताचा काही दिवसांपूर्वीच गर्भपात झाला होता. तेव्हापासून ती नैराश्‍यात गेली होती. तिच्या वागण्यात आणि बोलण्यातही फरक जाणवत होता. मात्र, अतुल तिची काळजी घेत होता. तिच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र, ती नेहमी तणावात राहत होती. नैराश्‍यातूनच निकिताने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.