रेल्वे प्रवासातच तिच्या वेलीवर उमलले फूल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : गावी परतण्याची आस, त्यातच येणाऱ्या पाहुण्याच्या विचाराने मनात उठलेले काहुर असा संघर्ष करीत ती पतीसोबत रेल्वेने प्रवास करीत होती. गावी परतल्यावर सर्वांना गोड बातमी द्यावी असा विचार करीत असतानाच तिला वेदना सुरू झाल्या आणि प्रवासातच तिच्या वेलीवर एक फूल उमलले. धावत्या रेल्वेत आई होण्याचा अनोखा अनुभव त्या मातेने घेतला. सहप्रवाशांनाही माणुसकीचा परिचय देत बाळाचे या जगात स्वागत केले.


हे कुठल्या चित्रपटाचे किंवा नाटकाचे कथानक नसून बंगळूर-गोरखपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये घडलेली घटना होय. किरणकुमारी या घटनेतील मुळ पात्र होय. ती मूळची उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरची रहिवासी आहे. कामानिमित्त पती कमलेशकुमारसोबत बंगळुरूला गेली होती. लॉकडाउनमुळे दोघेही तिथेच अडकून पडले होते. पत्नी गर्भवती असून काळजी घेणारे कुणीही नसल्याने कमलेशकुमार चिंतेत होता. गावी परतण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. स्थानिक प्रशासनाकडे तशी नोंदही करून ठेवली होती; पण योग जुळून येत नव्हता. अखेर बंगळुरू-गोरखपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमधून गावी परतण्याची संधी मिळाली.

बाळंतपणाची तारीख जवळ असली तरी हिंमत एकवटून प्रवासाची तयारी केली. अखेर त्यांचा प्रवास सुरू झाला. शुक्रवारी ही गाडी नागपूरजवळ येत असताना किरण कुमारीला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. डब्यातील महिलांनी तिची अवस्था ओळखली. साड्या, चादरी लावून आडप तयार करण्यात आला. सहप्रवासी महिलांच्या मदतीनेच तिने बाळाला जन्म दिला. घटनेची माहिती मिळताच नागपूर स्थानकावरील उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडून रेल्वेच्या डॉक्‍टरांना पाचारण करण्यात आले. महिला डॉक्‍टरांनी तपासणी करीत बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे निदान केले.

गाडीतून उतरण्यास नकार
लॉकडाउनमुळे हे दाम्पत्य अडकून पडले होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना गावी परतण्याची संधी मिळाली. गाडीतून उतरल्यास पुन्हा अडकून पडावे लागेल, या भीतीने ओली बाळंतीण आणि तिच्या पतीने गाडीतून उतरण्यास नकार दिला. मनातील भावना बोलून दाखवत त्यांनी पुढील प्रवास करून देण्याची विनंती केली. बाळ-बाळंतिणीची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना पुढील प्रवासाची परवानगी देण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com