बाजारात वाढली महिलांची गर्दी, पण कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. त्यात ज्वेलरी बॉक्‍स, छोट्या पर्स, लिपस्टिक्‍स, मोबाईल कव्हर, स्टिल भांड्यांमध्ये ताट, वाट्या, चमचे, बाऊल, पातेले, अगरबत्ती स्टॅंड आदी वस्तूंचा समावेश आहे. 

नागपूर : मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू आहे. तिळगूळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी सीताबर्डीसह शहरातील इतवारी, महाल, धरमपेठसह छोट्या मोठ्या भागातील बाजारपेठांत महिलांची गर्दी होत आहे. बुधवारी मकर संक्रांत असून, या दिवशी तिळगूळ द्या, गोड गोड बोला... असा संदेश देत एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे.

Image result for women rush in makar sankranti market

मकर संक्रांतीनिमित्त बाजारात सुगड्यांसोबतच विविध प्रकारचे वाण, तिळगूळ, बांगड्या आदी साहित्य उपलब्ध आहे. यंदा वाण वस्तूंच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाल्याने महिलांनी प्लॅस्टिक वस्तूंना पसंती दिल्याचे दिसते. प्लॅस्टिकमध्ये शंभर रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत तर स्टिल भांड्यांमध्ये 180 ते एक हजार रुपये रुपये डझनाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे किचन शॉपीचे संचालक मनोज चौरसिया यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुखांचे नाव आघाडीवर

संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. त्यात ज्वेलरी बॉक्‍स, छोट्या पर्स, लिपस्टिक्‍स, मोबाईल कव्हर, स्टिल भांड्यांमध्ये ताट, वाट्या, चमचे, बाऊल, पातेले, अगरबत्ती स्टॅंड आदी वस्तूंचा समावेश आहे. 

Image result for makar sankranti women market

भोगीसाठी तयारी

भोगीच्या तयारीसाठी सोमवारी बाजारात सुगड्यांच्या वाणासोबतच विविध प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध आहेत. वाटाणा, हरभरा, गाजर, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची घालून तयार केलेल्या भाज्यांची रेलचेल एकाच ठिकाणी दिसत होती. भाज्यांचे दर वाढलेले असले तरी या भाज्या एकत्र करण्याकडे महिलांचा कल होता. पंधरा ते वीस रुपये पाव असे या भाज्यांचे दर होते तर ओला हरभरा हा शंभर रुपये किलो दराने विकला गेला.

हेही वाचा - घरी सोडून देण्याचा बहाणा करून केला घात...

तिळगूळही महागले

यंदा तिळाचे लाडू 240 रुपये किलो, साखर रेवडी 160 रुपये, गुळाची रेवडी 200 रुपये, हलवा 120 रुपये किलो असून, मागील वर्षीपेक्षा भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजुबंद, अंगठी, झुमके अशा दागिन्यांना मोठी मागणी आहे. तीळ 150 ते 180 रुपये किलो आणि गूळ 50 ते 60 रुपये किलो असा दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The women market has increased in makar sankranti