कशामुळे लांबणीवर पडले नागपुरातील सिंथेटिक ट्रॅकचे काम

file photo
file photo


नागपूर : कोरोनामुळे शहरातील सर्व क्रीडा घडामोडींना 'ब्रेक' लागला असून, याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकलाही बसला आहे. येथील सिंथेटिक ट्रॅकचे काम वर्षभरात दुसऱ्यांदा लांबणीवर पडले आहे. 


विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी शिंडर ट्रॅकवर स्वतःचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतला होता. याची टेंडरसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. ट्रॅकचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. कामाला सुरुवात होणार तोच कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे ट्रॅकचे काम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. ट्रॅकचे काम पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी निवडणुकीचा ट्रॅकच्या कामाला फटका बसला होता. परिस्थिती सामान्य असती तर ट्रॅकच्या कामाला सुरुवात होऊन आतापर्यंत बरेच काम पूर्ण झाले असते, अशी माहिती शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. आम्ही एक वर्षापासून कामाला सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्याची परिस्थिती आमच्या नियंत्रणात नाही. प्रतीक्षा करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी सांगीतले. 


डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आम्ही ट्रॅकसाठी सार्वजनिक विभागाकडे आठ कोटी रुपये जमा केले. दुर्दैवाने लॉकडाउनमुळे काम सुरू होऊ शकले नाही. आम्ही सार्वजनिक विभागाच्या नियमित संपर्कात आहोत. काम केव्हा सुरू करायचे हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. बेस, ड्रेनेज सिस्टीम आणि लेव्हलिंग झाले असल्याने सिंथेटिक ट्रॅक पूर्ण व्हायला फारसा अवधी लागणार नाही. शिवाय वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे. 


पुरेशा जागेअभावी सिंथेटिक ट्रॅक केवळ आठ लेनचा राहणार आहे. याशिवाय ट्रॅकच्या दोन्ही बाजूला लॉंग जम्प पिट असतील. तसेच सध्याच्या सहा खांबाव्यतिरिक्त दोन हायमास्ट पोल्स असतील. चिखल होऊ नये यासाठी आतील फुटबॉल मैदानावर कृत्रिम गवत लावण्यात येणार आहे. प्रेक्षक व जनावरांपासून ट्रॅकचे संरक्षण करण्यासाठी सभोवताली कुंपण राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. नागपुरातील हा दुसरा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे. सध्या मानकापूर येथे सिंथेटिक ट्रॅक आहे. 
 

संपादन : नरेश शेळके 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com