स्वस्त धान्य दुकानातून युवक जात होता घरी; रस्त्यात घडले असे... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

सावरगावातून मसोरा रस्त्याने वडचिचोली रस्त्यावर वळताच चिंचोलीकडून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने त्याला चिरडून पन्नास-साठ फूट फरपटत नेले. त्याचा जागीच मृत्यू झाला.

सावरगाव (जि. नागपूर) : मध्य प्रदेशातून भरधाव येणाऱ्या टिप्परने सायकलस्वार युवकास चिरडले. चेतन सिद्धार्थ बन्सोड (19) रा. जुनोना फुके असे मृताचे नाव आहे. 

ही घटना शुक्रवारी दुपारी 12दरम्यान घडली. हेटी कुंडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा येथील चेतन सिद्धार्थ बन्सोड तालुक्‍यातील जुनोना फुके येथे आजोबा किसना तागडे यांच्याकडे राहत होता. आज दुपारी 12 वाजतादरम्यान तो सावरगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेऊन सायकलने जुनोना फुकेकडे निघाला. 

सावरगावातून मसोरा रस्त्याने वडचिचोली रस्त्यावर वळताच चिंचोलीकडून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने त्याला चिरडून पन्नास-साठ फूट फरपटत नेले. त्याचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक अर्जुन फकिरा कडबे, रा. चोरखैरी याने टिप्पर सावरगाव पोलिस चौकीसमोर आणला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. 

तणावाचे वातावरण 
सावरगाव पोलिस चौकीतील कर्मचारी घटना घडली तेव्हा आंतरराज्य सीमा नाक्‍यावर तैनात होते. चौकीत केवळ पोलिस हेडकॉन्स्टेबल धनराज भुक्ते तैनात होते. घटनास्थळ बसस्टॅंडजवळ असल्याने अपघात घडताच लोकांचा मोठा जमाव चौकीसमोर गोळा झाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, धनराज भुक्ते यांनी परिस्थिती सांभाळली. 

हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...  

वाहतूक कर्मचारी करतात केवळ वसुली 
नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत तीन वाहतूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी दोघांना सावरगाव भागाची जबाबदारी आहे. परंतु, ते केवळ वसुली करण्यात मश्‍गुल असतात. मध्य प्रदेशातून वाळू, विटांची मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात वाहतूक होत असते. या अवजड वाहनांवर कोणाचाही वचक नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in accident