Video : सेलिब्रेशनच्या नावावर फुटाळा तलावावर 'झूम... झूम... झूम बाबा...' 

अनिल कांबळे
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

शहरातील अनेक जण कुटुंबीयांसह फुटाळ्यावर फेरफटका मारायला येतात. या परिसरात "स्ट्रिट फूड'ची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली आहेत. त्यामुळेच फुटाळा चौपाटी असे नाव पडले आहे. मात्र, गेल्या महिन्यांपासून फुटाळ्यावरील माहौल पार बदलला आहे. प्रेमीयुगुलांसाठी अश्‍लील चाळे करण्याचा अड्डा फुटाळा तलाव परिसराला बनविण्यात आला आहे.

नागपूर : नागपुरातील फुटाळा तलाव म्हणजे युवा पिढीचे पर्यटन स्थळ समजले जाते. प्रेमीयुगुलांसह क्‍लास बंक करून कॉलेज बॅगसह विद्यार्थी फुटाळ्यावर एंजॉय करायला जातात. सायंकाळच्या सुमारास तर युवांची मोठी गर्दी असते. मात्र, आता फुटाळा अश्‍लील चाळे आणि मौजमस्तीसह चक्‍क दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या काही जोडप्यांनी चक्‍क दारूचे ग्लास आणि काहींनी तर थेट बियरची बॉटल तोंडाला लावली. या सर्व प्रकाराकडे तैनात असलेल्या पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केले, हे विशेष. फुटाळ्यावर तरुणांचा "झूम.. झूम.. झूम बाबा...' सुरू होता.

हेही वाचा - पत्नी गावाला गेली आणि त्याने नको ते केले

शहरातील फुटाळा आणि अंबाझरी तलावावर एन्जॉय करण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र, नववर्षाच्या स्वागताची संधी साधून शेकडो प्रेमीयुगुलांनी फुटाळा गाठले. काहींनी तर चक्‍क दारूच्या बाटल्या आणि चकना सोबत आणला. दुपारी तीन वाजताच्या सुमारास काही तरुणी आणि तरुण फुटाळ्यावर आले. मुलींनी लगेच बॅगमधून बिअरच्या बाटल्या काढल्या तर तरुणांनी सिगारेट काढल्या. काही मिनिटातच तरुण आणि तरुणी सेलिब्रेशनच्या नावावर बिअरच्या बाटल्या रिचवायला लागले. तरुणींच्या हातात सिगरेट तर दुसऱ्या हाती बिअरची बाटली असे काहीसे चित्र पाहायला मिळाले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी फुटाळ्यावर पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. मात्र, एकाही पोलिस कर्मचाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही, हे विशेष. 

शहरातील अनेक जण कुटुंबीयांसह फुटाळ्यावर फेरफटका मारायला येतात. या परिसरात "स्ट्रिट फूड'ची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली आहेत. त्यामुळेच फुटाळा चौपाटी असे नाव पडले आहे. मात्र, गेल्या महिन्यांपासून फुटाळ्यावरील माहौल पार बदलला आहे. प्रेमीयुगुलांसाठी अश्‍लील चाळे करण्याचा अड्डा फुटाळा तलाव परिसराला बनविण्यात आला आहे.

Image may contain: one or more people and people standing

फुटाळ्यावरील सुरक्षा भिंतीवर प्रेमीयुगुल स्कार्फ चेहऱ्यावर घेऊन अश्‍लील चाळे करतात, हे चित्र आता नेहमीचेच झाले आहे. सायंकाळ झाल्यानंतर हा प्रकार तर सर्रास बघायला मिळतो. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास कुटुंबीयांसोबत किंवा लहान मुलांसोबत फुटाळ्यावर गेल्यानंतर शरमेने नागरिकांनाच मान खाली घालावी लागते. फुटाळ्यावर दारू आणि अंमली पदार्थाचा नशा ही सामान्य बाब झाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे फुटाळ्यावरील वातावरण दूषित होत असल्याची जनभावना आहे.

काय झालं असावे - प्लीज तू घरी परत ये, अन्‌...

'ड्रग्स'चे झुरकेसुद्धा

उपराजधानीत "ड्रग्स' अगदी सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्वाधिक कॉलेजवयीन युवक-युवतींना ड्रग्सचे व्यसन लागले आहे. फुटाळ्यावर युवक आणि युवती बिनधास्तपणे नाकाने ड्रग्स ओढताना दिसतात. मुली पर्समधून हळूच डब्बी काढून ड्रग्सची नशा करताना दिसतात. मात्र, पोलिसांनी अशा प्रकाराकडे "अर्थपूर्ण' दुर्लक्ष केल्याचे दिसते.

Image may contain: one or more people, people standing, shoes, beard and outdoor

शाळकरी विद्यार्थ्यांचीही गर्दी

फुटाळा तलावावर सध्या शाळकरी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. अगदी 12 ते 15 वर्षांतील मुले आणि मुली शाळेचे दप्तर पाठीवर घेऊन फुटाळ्यावर हातात हात घालून फिरताना आढळतात. या प्रकारामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. परंतु, पोलिसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Consumes liquare on Futala lake