भाऊसाहेब फुंडकर मातीशी नाते राखणारा नेता

pandurang_phundkar
pandurang_phundkar

अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण केले. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यातील नारखेड हे त्यांचे जन्मगाव. २१ ऑगस्ट १९५० रोजी निरीक्षर, गरीब शेतकरी दाम्पत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. कोणत्याही परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता अतिशय संयमी व खंबीरपणे मार्गक्रमण करणे हा भाऊसाहेबांचा पिंड होता. शालेय शिक्षण गावी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते खामगाव आले येथेच त्यांच्यात राजकीय नेतृत्त्वाची बिजे रूजली आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी नेते झाले. तसेच आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. भाऊसाहेबांनी राजकीयच नव्हे, तर सामाजिक जीवनातही मानाचे स्थान पटकावले होते. दोन वेळा विधानसभेचे आमदार, तीन वेळा खासदार, तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे कृषिमंत्री, अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता आणि शेतकरी हा त्यांचा श्वास होता.

शेती आणि मातीशी घट्ट नाते
भाऊसाहेब फुंडकर यांची शेती आणि माती यांच्याशी घट्ट नाते जुळले होते. आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेते आणि मंत्रिपद या त्यांच्या प्रवासात भाऊसाहेबांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. विदर्भातील कापूस, सोयाबीन या प्रश्नांवर भाऊसाहेब नेहमीच आक्रमक राहिले. कृषिमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांमधील निराशावादी चित्र बदलायचे आहे... परवडणारी शेती करण्याचा ध्यास असल्याचे ते नेहमीच सांगत. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, कमी खर्चातील सिंचन व्यवस्था निर्माण करणे, जलयुक्तमधील थेंब अन् थेंबाचा योग्य वापर होणे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे यावर ते आग्रही होते. कोरडवाहू शेतकऱ्यांना अच्छे दिन आले पाहिजे, असे ते म्हणत. त्यासाठी त्यांनी काही प्रकल्पही हाती घेतले होते. शाश्वत शेती विकास हेच ध्येय त्यांनी ठेवले होते. नातेसंबंध करताही त्यांनी शेतकरी कुटुंबांशीच नाळ कायम राखली.

अॅग्रोवनचे ब्रँडअॅम्बेसिडर
शेती आणि शेती प्रश्न हा भाऊसाहेब फुंडकर यांचा जिव्हाळ्याचा विषय... दररोज सकाळी उठल्याबरोबर सकाळचे कृषी विषयक दैनिक असलेल्या अॅग्रोवनचे वाचण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे... अॅग्रोवनमध्ये आज काय आले? कोणते नवे प्रयोग सूचविले आहेत? कुणाच्या यशोगाथा आल्या आहेत? याबाबत ते जागृक असत. अॅग्रोवनमध्ये शेती किंवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न आला तरी त्यावर प्रशासनाला तातडीने काम करण्याचे निर्देश देत असत. सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करतानाही दरवेळी ते अॅग्रोवनचा आवर्जून उल्लेख करीत होते. शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर अॅग्रोवन वाचत चला, त्यातील यशस्वी प्रयोग करा, मार्गदर्शन घ्या, असे ते नेहमीच सांगत.

खांद्यावरचा हात
सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ कायम राखणारे नेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांची ओळख आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या गुजगोष्टी करणे ही त्यांची स्टाईल होती. त्यामुळे एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की, तो त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता होत असे. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते केवळ भाऊसाहेबांना खांद्यावर हात ठेवला म्हणून वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करीत असत. सर्वसामान्यांना कोणतेही काम असले तरी भाऊसाहेबांपुढे मांडण्याची भीती कुणालाही वाटत नव्हती. ते कुठेही गेले तरी त्यांच्या भोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा राहत असे.

भाजपचा जुना शिलेदार गेला
भाऊसाहेब, भाजपचा एक जुना शिलेदार हरपला आहे. ज्यावेळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ग्रामपंचायत ते केंद्र सरकार सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला होता. त्या काळात भाऊसाहेबांनी संघ विचारांची पताका खांद्यावर घेतली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. संघाचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते, जनसंघाच्या युवा आघाडीचे पदाधिकारी ते भाजपचे नेते असा त्यांचा प्रवास राहिला. राजकारणात त्यांनी अनेक चढउतार अनुभवले. मात्र, संयम कधी ढळू दिला नाही. पश्चिम विदर्भात भाजप रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते नेहमीच लढत राहिले. खामगाव ते आमगाव ही शेतकरी दिंडी गेल्या ४५ वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासातील मैलाचा दगड ठरली. विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभेवर लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली आहे. राजकारणातील पदाचा त्यांनी कधीही गर्व केला नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळली होती. ग्रामीण भागात विशेषतः वऱ्हाडात भाजप रूजविण्याचे त्यांचे योगदान मोठे आहे. प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून काम करण्याची मानसिकता असलेल्या पिढीतील भाऊसाहेब हा कदाचित शेवटचा दुवा ठरेल.

बहुजनांचा चेहरा हरपला
भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजन चेहरा हरपला आहे. फुंडकरांचे आकस्मिक जाणे हा गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतरचा भाजपला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. भाऊसाहेब फुंडकर अतिशय संयमी होते मात्र, विचारांचेही तेवढेच पक्के होते. राजकारण व पक्षातील अनेक चढउतार अनुभवताना त्यांनी वैयक्तिक विचार, पक्ष आणि शेतक-यांवरील निष्ठा कधी ढळू दिली नाही. गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी खऱ्या अर्थाने भाजपला बहुजन समाजात रूजविले. पक्षाच्या मागे मोठी शक्ती निर्माण केली. नाथाभाऊंचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्या रूपाने बहुजन चेहरा मंत्रिमंडळात आणणे भाजपला भाग पडले होते. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने बहुजन समाजातील एक चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाजपेयींसोबतची आठवण....
भाऊसाहेब फुंडकरांच्या जीवनात काही राजकीय चढउतार नेहमीच चर्चेचे विषय राहिले. प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्या साथीने ते राजकीय जीवनात वावरत होते. पश्चिम विदर्भातील त्याकाळात अतिशय प्रभावी नेते होते. अकोल्याचे ते तीनवेळा खासदार राहिले. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. परंतु ज्या-ज्या वेळी ते निवडून आले त्यावेळी केंद्रात भाजपची सत्ता आली नाही. ज्या वेळी त्यांचा पराभव झाला त्यावेळी सत्ता आली होती. ‘अब की बारी अटल बिहारी’ ही घोषणा जोरात होती. अकोल्यातील प्रचार सभेच्यावेळी खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनीच म्हटले होते, उठा कृषी मंत्री भाषण करा.... मात्र त्यावेळी ते पराभूत झाले. निवडून आले असते तर देशाचे कृषिमंत्री राहिले असते. राज्यात भाजप दोन वेळा सत्तेवर येऊनही त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. यावेळी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर बहूजन चेहरा म्हणून त्यांना सधी मिळाली. देशाचे होऊ शकले नाहित मात्र, राज्याचे कृषिमंत्री झाले... ती कारकिर्दही पूर्ण होऊ शकली नाही.

टेक्सस्टाईल पार्कचे स्वप्न
वऱ्हाड टेक्सस्टाईल पार्क उभा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी खामगाव जवळ १०० हेक्टर जागाही त्यांनी निवडली होती. त्यांच्या हयातीत हा प्रकल्प मार्गी लागला असता तर अधिक चांगले झाले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com