टाइल्सच्या कडप्याखाली दबून मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

कामठी (जि.नागपूर):स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रनाळा येथील मोरबी टाइल्समध्ये मागील 20 वर्षांपासून मजूर स्वरूपात काम करीत असलेल्या मजुराच्या अंगावर कडप्पे पडल्याने त्या कडप्प्यातच दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. मृत मजुराचे नाव प्रदीप रामदास चौरे(40,कुंभारे कॉलनी कामठी) असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप चौरे व त्याचे वडील रामदास चौरे हे मागील 20 वर्षांपासून रनाळा कामठी येथील मोरबी टाइल्समध्ये कार्यरत आहेत. दैनंदिनरित्या गुरुवारी दुपारी मोरबी टाइल्समध्ये टाइल्सचे सुमारे सहा कडप्पे इतर मजुरांच्या साहाय्याने उचलत असताना अचानक तोल न सांभाळल्याने इतर मजुरांनी जीव वाचवून बाजूला सारले. मात्र, प्रदीपच्या अंगावर सर्व कडप्पे पडल्याने त्या कडप्प्यातच दबून त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी आसटकर, मनोज चौधरी, धोटे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविला. पोलिसांनी यासंदर्भात तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृताच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: टाइल्सच्या कडप्याखाली दबून मजुराचा मृत्यू