"टेकऑफ'चा मुहूर्त सापडेना

File photo
File photo

अमरावती : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी बेलोरा येथील विमानतळाची नितांत आवश्‍यकता असल्याचे वारंवार सांगितल्या जात असले तरी अद्यापही या विमानतळावरून टेकऑफचा मुहूर्त सत्ताधाऱ्यांना या पाचवर्षांतसुद्धा साधता आला नाही. या सोबतच रेल्वे वॅगन कारखाना, नांदगावपेठ येथील मिसाईल कारखानासुद्धा सुरू झाला नाही.
आघाडी सरकारच्या काळात बेलोरा येथील विमानतळ लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात होते. परंतु नंतर युतीचे सरकार आले. आतातरी विमानाचे टेकऑप होईल, असे मानले जात होते. परंतु गेल्या पाच वर्षांत अनेकदा विमानतळाचे काम पूर्ण होत असल्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्या, मात्र, प्रत्यक्षात अद्यापही टेकऑफचा मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागते हे कळणे कठीण झाले आहे. विमानतळ झाले तर येथे मोठे उद्योजक येतील, औद्योगिक विकास साधता येईल, त्यातून अमरावतीच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, विमानतळाचा पत्ता अद्यापही लागलेला नाही.
बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याचीसुद्धा तीच अवस्था असून नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या मिसाईल कारखान्याचे भिजत घोंगडे कायम आहे. या ठिकाणी टेक्‍सटाईल पार्कच्या निमित्ताने काही चांगले उद्योग आले, परंतु स्थानिक युवकांच्या रोजगाराचा मुद्दा अद्यापही निकाली निघालेला नाही.

रस्त्यांचे जाळे,
रोजगाराचा पत्ता नाही
या पाच वर्षांत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबूत झाले. अमरावती -वरुड या मार्गासोबतच शहर व ग्रामीण मधील अनेक रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे झाले. चांदूररेल्वे रस्त्याचे कामसुद्धा सुरू आहे. शहरात नवा उड्डाणपूल होत आहे. परंतु येथील शिक्षित युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटला नाही.

पर्यटन विकासाला खीळ
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या विकासावर गेल्या पाच वर्षांपासून घोषणांचा पाऊस सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात चिखलदऱ्यात फारसा बदल झालेला नाही. काही ठिकाणचे रस्ते वगळता चिखलदरा आहे त्याच चिखलात आहे. पर्यटनात मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता असतानाही त्याकडे पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिल्या गेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com