बनावट कागदपत्रांद्वारे एक कोटी 20 लाखाने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

यवतमाळ : बनावट कागदपत्रे तयार करून एकूण एक कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित फरार असून, आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

यवतमाळ : बनावट कागदपत्रे तयार करून एकूण एक कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित फरार असून, आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.
रजनीशकौर करमसिंग बेदी, जसवंतकौर करमसिंग बेदी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था उमरसरा अंतर्गत घाटंजी तालुक्‍यातील राजुरवाडी व सावरगाव मुंगी येथे किसनसिंग जितसिंग सिद्धू नावाने सरकारमान्य अनुदानित शाळा आहे. शाळेला गणपत कन्नलवार यांनी एक एकर 20 गुंठे शेती व रोख 33 हजार रुपये दान दिले. धर्मदाय आयुक्त यांची परवानगी व कोणताही ठराव न घेता संशयितांनी शेती स्वत:च्या नावे केली. संस्थेवर 78 लाखांचे कर्ज असल्याचे खोटे कागदपत्रे तयार केलीत. शिक्षकांनी दिलेले 20 लाख रुपये शाळेच्या कामासाठी वापरले नाहीत. त्याचा कोणताही हिशेब नाही. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून संगणक खरेदीसाठी 50 हजार रुपये मिळाले. मात्र, साहित्य खरेदी केलीच नाही. दोन्ही शाळांना मिळालेले वेतनेत्तर अनुदान 15 लाख रुपये शाळेच्या कामासाठी वापरले नाही. अशा प्रकारे एकूण एक कोटी 20 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
न्यायालयाने जामीन नाकारला
रजनीशकौर बेदी, जसवंतकौर बेदी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अपर सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने अटी व शर्ती ठेवून दोन ऑगस्टला अंतरीम जामीन तात्पुरता मंजूर केला. मात्र, संशयितांना सूचनापत्र देऊन तपासासाठी हजर झाले नाहीत. दिलेल्या पत्त्यावर ते राहत नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर अपर सत्र न्यायालयाने 31 ऑगस्टला अटकपूर्व जामीन नाकारला. सध्या आरोपी फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: बनावट कागदपत्रांद्वारे एक कोटी 20 लाखाने फसवणूक