मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर : एक्‍झिट पोलने भाजपच्या दणदणीत विजयाचे संकेत दिले आहे. त्यात खूप काही बदल होईल असे वाटत नसून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. पंतप्रधान म्हणून आपल्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, त्यात काही तथ्य नाही. चर्चेला मी थांबवू शकत नसल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या पोस्टरचे गडकरी यांच्या हस्ते रामनगरातील "भक्ती' बंगल्यावर आज प्रकाशन झाले. यावेळी चित्रपटात मोदी यांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेराय, निर्माते संदीपसिंग प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपने पाच वर्षांत देशाच्या विकासासाठी केलेले कार्य, जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिमा आणि गरीब व शोषितांसाठी केलेल्या कामांमुळे नरेंद्र मोदी जनतेच्या मनामनात बसले आहेत. पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने दिला. त्यामुळे मतदारांनी भाजपलाच पसंती दिल्याचे एक्‍झिट पोलवरून स्पष्ट होते.
एक्‍झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे. यातून कुणाला किती जागा मिळतील, कुणाचे सरकार येईल, याचे संकेत मिळतात. या पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि एनडीएला 300 हून अधिक जागा मिळतील असे दिसते, असे गडकरी म्हणाले.
पंतप्रधानपदाबाबत सुरू असणाऱ्या चर्चेचे काय आणि कुठले खाते आवडेल, याबाबत विचारले असता पंतप्रधानपदाबाबत यापूर्वीही उठलेल्या चर्चांना काहीच अर्थ नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले. चर्चेला कुणीही थांबवू शकत नाही. कुणाला कोणते खाते द्यायचे हा पूर्णपणे पंतप्रधानांचा अधिकार आहे. पंतप्रधान देतील ते खाते सांभाळण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com