सौंदर्यीकरणासाठी झाडांची कत्तल?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर) : आजनी-गादा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील झाडे अवैधरित्या तोडण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कामठी (जि.नागपूर) : आजनी-गादा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील झाडे अवैधरित्या तोडण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
स्मशानभूमी अनेक वर्षांपासून सोयीसुविधांपासून उपेक्षित होती. त्यामुळे सौंदर्यीकरणाची मागणी केली जात होती. या मागणीला दाद देत या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे कार्य करण्याकरिता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. सौंदर्यीकरणाचे कार्य सुरू होण्याआधी काम अवैध वृक्षतोडीच्या वादात अडकले. सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून या विभागालाच या वृक्षतोडीची माहिती नाही, हे आश्‍चर्य आहे. वृक्षतोडीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरित्या परिसरातील झाडांची कत्तल सुरू आहे. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्याने ही माहिती मीडियावर व्हायरल होऊ लागली. एकीकडे शासन पर्यावरण वाचविण्याकरीता मोहिम राबवित आहे आणि दुसरीकडे अशी अवैध वृक्ष कत्तल सुरू आहे. शासन प्रचार-प्रसार करून त्याकरिता लाखो रुपये खर्ची घालीत आहे. परंतु येथे या शासनाच्या योजनेला तिलांजली देण्याचे काम या अधिकाऱ्यांच्या हातून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील काही दिवसांत भानेगाव येथे अवैधरित्या झाडांची वृक्षतोड करून लाकडांची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्यांवर वनविभागाने मोठी कारवाई केली होती.
या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. अवैध वृक्षतोडीची कार्यवाही करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याकरिता संबंधित विभागाला विचारणा करण्यात येणार असून आवश्‍यक भासल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते.
रमाकांत डाके
मुख्याधिकारी
नगर परिषद, कामठी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: सौंदर्यीकरणासाठी झाडांची कत्तल?