बालकांची घरवापसी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - कोणत्याही कारणांमुळे घरापासून दुरावलेल्या आणि रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या मुलांसाठी रेल्वे चाइल्ड लाइन वरदान ठरले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर गेल्या पावणेचार वर्षांमध्ये संकटात असलेली १ हजार १६० बालके आढळलीत. त्यापैकी १ हजार १२३ बालकांची चाइल्ड लाइनच्या प्रयत्नांनी घरवापसी झाली. 

नागपूर - कोणत्याही कारणांमुळे घरापासून दुरावलेल्या आणि रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या मुलांसाठी रेल्वे चाइल्ड लाइन वरदान ठरले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर गेल्या पावणेचार वर्षांमध्ये संकटात असलेली १ हजार १६० बालके आढळलीत. त्यापैकी १ हजार १२३ बालकांची चाइल्ड लाइनच्या प्रयत्नांनी घरवापसी झाली. 

असामाजिक तत्त्वांचे एकाकी मुलांवर नेहमीच लक्ष असते. बरेचदा प्रलोभन दाखवून त्यांचा उपयोग बेकायदेशीर कामांसाठी केला जातो. ही बाब लक्षात घेत रेल्वे आणि महिला व बालविकास मंत्रालयाने संकटातील बालकांना आधार देण्याचा निर्णय घेतला. बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड लाइनचा १०९८ ही हेल्पलाइन सुरू झाली. त्याद्वारे अडचणीत असणाऱ्या बालकांना गरजेनुसार मदत उपलब्ध करून दिली जाते. 

नागपूरसह देशभरातील ३५ रेल्वेस्थानकावर हा उपक्रम सुरू आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर जून २०१५ मध्ये चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनला कामाची मान्यता मिळाली. या संस्थेने वरदान इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ॲडप्शन ॲण्ड चाइल्ड वेलफेयरची नियुक्ती केली. नागपूर स्थानकावर २७ जुलै २०१५ पासून प्रत्यक्ष बालकांच्या मदतीचे कार्य सुरू झाले. कोणत्याही माध्यमातून अडचणीतील मुलांची माहिती मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन पाल्यांना त्यांच्या स्वाधीन केले जाते.

घर सोडण्याची  अनेक कारणे
नागपूर स्थानकावर आढळलेल्या बालकांमध्ये सर्वाधिक मुले पालकांच्या रागावर घर सोडून आलेली आहेत. त्यात ४ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. दारिद्र्य, मतभेद, कौटुंबिक कलह, राग, अगदी प्रेमप्रकरण किंवा आकर्षणातून मुले घरून निघून जातात.

12 जणांचे तीन पथक तैनात
चाइल्ड लाइनच्या मदत केंद्रातून १८ वर्षांपर्यंतच्या एकाकी बालकाला मदत दिली जाते.
रेल्वे कर्मचारी, पोलिस, रेसुब जवान, विक्रेते, कुली, ऑटोचालक, प्रवासी आदी माध्यमातून संस्थेला अडचणीतील मुलांची माहिती मिळते.
प्राथमिक मदतीनंतर मुलांना शासकीय बालनिरीक्षण गृहात पाठविले जाते. 
समुपदेशनाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणाची व्यवस्था करण्यात येते.
नागपूर रेल्वेस्थानकावर समन्वयक, समुपदेशक, ८ कार्यकर्ते आणि तीन स्वयंसेवक असे एकूण १२ जणांचे पथक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहे.

Web Title: 1 thousand 123 child return to home