जिल्ह्यात दहा टक्‍केच सिंचन विहिरी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

दोन वर्षांत १५०० विहिरींचे उद्दिष्ट : ६६७ कामांना सुरुवात

गोंदिया - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सिंचनासाठी २०१६-१७ व २०१७ -१८ या दोन वर्षांसाठी १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत केवळ १५२ विहिरींचे काम पूर्ण झाले. याची टक्केवारी केवळ १० आहे. 

दोन वर्षांत १५०० विहिरींचे उद्दिष्ट : ६६७ कामांना सुरुवात

गोंदिया - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सिंचनासाठी २०१६-१७ व २०१७ -१८ या दोन वर्षांसाठी १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत केवळ १५२ विहिरींचे काम पूर्ण झाले. याची टक्केवारी केवळ १० आहे. 

शेतकऱ्यांना सिंचनाची व्हावी म्हणून शासनाकडून आता ‘मागेल त्याला विहीर’ अशी योजना राबविली जात आहे. रोहयोच्या माध्यमातून विहिरी तयार करण्यात येत आहेत. यात जिल्ह्याला १५०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६-१७ व २०१७-१८ अशा दोन वर्षांत जिल्ह्याला ही उद्दिष्टपूर्ती करावयाची आहे. यात सालेकसा व सडक अर्जुनी या दोन तालुक्‍यांत प्रत्येकी १५० सिंचन विहिरी तयार करावयाच्या आहेत. उर्वरित सहा तालुक्‍यांना प्रत्येकी २०० सिंचन विहिरी तयार करायच्या आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ६६७ विहिरींचे बांधकाम सुरू करण्यात आले.

१५२ विहिरींचे काम पूर्ण झाले. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या कामातील ५१५ विहिरींचे काम अद्याप अपूर्ण आहे. यात आमगाव तालुक्‍यात १५३, अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात ८१, देवरी तालुक्‍यात ११९, गोंदिया तालुक्‍यात १०१, गोरेगाव १०९, तिरोडा तालुक्‍यात ८३ सिंचन विहिरींचे काम सुरू झाले. सालेकसा तालुक्‍यात १६; तर सडक अर्जुनी तालुक्‍यात ५ विहिरींचे काम सुरू आहे. आमगाव तालुक्‍यात १७, अर्जुनी मोरगाव ४७, देवरी २२, गोंदिया १२, गोरेगाव १६, सडक अर्जुनी व तिरोडा येथे प्रत्येकी ६ तर सालेकसा तालुक्‍यात दोन विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेले सिंचन विहिरींचे उद्दिष्ट केवळ १० टक्‍के साध्य झाले. तर ९० टक्‍के विहिरींचे काम शिल्लक आहे. पुढच्या वर्षात १,३४८ विहिरींचे काम पूर्ण होईल का, याबाबात शंका उपस्थित होत आहे. 

पाचशेवर काम अपूर्ण
जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १५२ सिंचन विहिरी तयार झाल्या. ५१५ विहिरींचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्याला दिलेल्या १५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी ७८४ सिंचन विहिरींच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही. आमगाव तालुक्‍यातील १४५ विहिरी, अर्जुनी मोरगाव ६६, देवरी १०६, गोंदिया ९१, गोरेगाव ९३, सडक अर्जुनी ४, सालेकसा १६ व तिरोडा तालुक्‍यातील ४२ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

Web Title: 10% irrigation well compete in district